Sunday, November 28, 2010

सोलेमस्कोगेन (नॉर्वे)

ऑस्लोच्या उत्तरेला कोठलीशी एक टेकडी आहे असे माहीत होते. मागे अक्षय तिकडे जायचे म्हणून बसने आणि पायी बराच फिरला होता. पण खराब हवामानामुळे त्याला मधूनच मागे फिरायला लागले होते.

एकदा तिकडे जाऊनच येऊ या असे म्हणत आम्ही 'सोलेमस्कोगेन'ला जाणरी ५६ नंबरची बस पकडली. या मार्गावरचा सोलेमस्कोगेन हा सगळ्यात शेवटचा थांबा आहे. इथून बस मागे वळते आणि परत ऑस्लोला जाते. जाताना तुरळक घरे दिसतात. रस्ताही थोडा वळणावळणाचा.

सोलेमस्कोगेनला आम्ही बसमधून उतरलो आणि सगळीकडे पसरलेले, कापसासारखे पिंजून ठेवलेले हिम दिसू लागले.



खूप थंडीही वाजू लागली. तसे आम्ही बर्‍याच तयारीने गेलो होतो. जॅकेट, स्वेटर, मोजे, बूट. पण ती तयारीसुद्धा पुरेशी वाटत नव्हती.

आम्हाला सोडून आमची बस तर निघून गेली. पुढची बस बरोबर एका तासाने होती. म्हणजे एकंदरीत बराच वेळ होता. समोर वाट खुणावत होती. आम्ही चालायला सुरूवात केली.



इथून पुढे अर्धा तास आम्ही स्वर्गात होतो. दोन्ही बाजूला उंच सुरूची झाडे, त्यांच्या पानात अडकून राहिलेले मऊसूत हिम, वार्‍याच्या एखाद्या लहरी बरोबर ते खाली यायचे आणि वाटायचे हिमवर्षाव सुरु झाला की काय?





मग एखाद्या चित्रपटाला शोभावे असे 'लोकेशन' सापडले. इथे बसून फोटो काढण्याचा मोह अक्षयला आवरला नाही,

(अक्षय)


इथे 'स्किंग' करायला बरेच लोक येतात. मधूनच एखादा माणूस सूं सूं करत जायचा.



थोडे पुढे चालत गेल्यावर गोठलेला तलाव दिसला.



याच्यावर चालत जायची खूप इच्छा होती. पण आम्ही दोघेही इतके गारठलो होतो की जीभ जड झाल्याने नीट बोलताही येत नव्हते.



अप्रतिम निसर्गसौंदय आणि भयानक गारठा दोन्हीमुळे पाय हालत नव्हता. पण अंधार पडू लागला होता. मागे फिरलो, सुरुची झाडे हात हलवून निरोप देत होती.



बसस्टोपवर पोचलो तेव्हा दिवेलागण सुरू झाली होती. बस ठरल्यावेळी आली आणि आम्ही ऑस्लोला परत येऊ लागलो. आज आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षाही बरेच काही मिळाले होते. :)

Saturday, October 30, 2010

अवचित....

प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, कोणतेही प्रश्न तेव्हा आठवत नाहीत, सुख-दु:ख सार्‍याचा विसर पडतो. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते.

अजूनही गर्द रानाने वेढलेला अवचितगड कोकणात रोह्याच्या जवळ आहे. पुण्याहून रोह्याला जायला ४ तास लागतात. तिथून पुढे पिंगळसई किंवा मेढा या गावी यावे. या दोनही गावातून पायवाट गडावर जाते. कोकण रेल्वे या गडाला अगदी बिलगून जाते.

आम्ही पिंगळसईला साधारणपणे ११ वाजता पोचलो. पोचल्या पोचल्याच आमच्या गाडीचे चाक धरणी मातेने आपल्या पोटात घेतले. मग आमच्यातील 'हौशी' मंडळींनी ड्रायवरला 'चाक घुमाव', 'आगे लो', 'पिछे लो' अशा सुचना द्यायला सुरवात केली. पण चाक तसूभरही हलेना. वैतागून शेवटी ड्रायवरने महारथी कर्णाच्या आवेशात 'चक्रोत्धारणा'ची जबाबदारी पूर्णपणे स्वतःवर घेतली. आणि आम्ही गडावर जायला मोकळे झालो.

आमच्यापैकी कुणीच गडावर आधी गेलेले नव्हते. पिंगळसईमध्ये वाट विचारून घेतली. दिवस नवरात्राचे. सहाजिकच वाटेवर अनेक प्रकारची फुले फुलली होती. फुलांमध्ये या दिवसात केशरी-पिवळा रंग खूप दिसतो. तरी त्यातही किती विविधता. काही फुले इवलीशी, नजरेला सहज न दिसणारी, तर काही हातभर मोठी. रानभेंडीचे तर जणू पीकच बहरलेले होते.

रानभेंडी



वाघनखीची फुलेही भरपूर फुलली होती. ही फुले म्हणजे निसर्गाचे निराळेच नवल आहे. साधारणपणे फुलांची रचना ही, परागकण मध्यभागी आणि भोवती नाजूक पाकळ्या अशी असते. पण वाघनखीची गोष्टच वेगळी. झुडुपाची नाजूक डहाळी मुडपून त्यातून ज्वाळेसारख्या पाकळ्या बाहेर येतात आणि भोवतीने परागकण विखुरलेले असतात. अशा नवलाईचे हे एकमेव फूल असावे. याची पानेही तेवढीच नाजूक, मखमली, लांबोडकी आणि वेलीप्रेमाणे टोकाशी दुमडलेली.

वाघनखी (ग्लोरी लीली)



नजरेला भुरळ पाडणारे फुलांचे ताटवे दुतर्फा असले तरी वातावरण मात्र मुळीच चांगले नव्हते. वरून सुर्य आग ओकत होता. अंग घामाने निथळत होते. प्रत्येकाचीच बिकट अवस्था होत होती. जो तो आपापल्या परीने उन्हाचा ताप कमी करायचा निरर्थक प्रयत्न करत होता.



अर्ध्या तासाच्या भर उन्हातील चढाईनंतर झाडांची गर्दी वाढू लागली. वाट सुसह्य होऊ लागली. पण थकवा जाणवतच होता. बरेचसे सवंगडी मागे राहीले होते. पाऊण डोंगर चढून झाल्यावर मेढ्याकडून येणारी वाट उजव्या बाजूने येऊन मिळते. अनावधानाने आम्ही ही वाट पकडली आणि भरकटलो. या वाटेने थोडे पुढे गेलो. माझ्या पुढे निखिल आणि महेंद्र दोघेच होते.

"फणा फाहिलास का?" - निखिल

"हो रे" - महेंद्र

हे शब्द एकताच मी कान टवकारले. मला वाटले नागफणीचे फूल यांना दिसले असावे. ते पहावे म्हणून मी पळतच दोघांना गाठले. समोर पाहतो तो काय...

प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, दुसरे काहीही तेव्हा आठवत नाही. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते. तरीही तो क्षण आला होता, आमची वाट पाहात होता.

समोर एक नाग वाटेच्या डाव्याबाजूला निपचिप पडला होता. त्याने फणा पूर्ण उघडला होता. त्याची लांबी चार-पाच फूट असेल. जाडी मनगटा एवढी. हलचाल थोडीही होत नव्हती. दोन क्षण सारेच स्तब्ध झाले.



"मेलाय की काय?" - महेंद्र

"हात लावून पाहू का?" - निखिल

"वेडा आहेस का?" - मी

या संभाषणात जो काही वेळ गेला तेवढ्यामध्ये नागाच्या फण्याची थोडी हलचाल झाली. आणि तो जिवंत आहे हे सार्‍यांच्या नीट ध्यानात आले. निखिलने प्रसंगावधान दाखवून कॅमेरा काढला. तो पटापट नागाचे फोटो घेऊ लागला. २ मिनिटे होऊन गेली. पण नागराजांचा जागेवरून हलण्याचा कोणताही बेत दिसत नव्हता. मग तो तसा का पडला आहे यावर सगळे तर्क लढवू लागले.

"त्याने काही तरी गिळले असेल" - मी

"नाही, तो दबा धरून बसला असेल." - निखिल

"अरे, कात टाकत असेल." - कपिल



कोणालाच काही समजेना. मागून आमचेच २०-२५ सवंगडी गड चढत होते, परिणामी या अवस्थेत जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. शेवटी निखिल व महेंद्रने वाट शोधत पुढे जावे आणि कपिलसोबत मी मागे राहून मागून येणार्‍यांना सावध करावे असे ठरले. ते दोघे जसे पुढे गेले तशी नागाची हलचाल एकदम वाढली. तो झटक्यात मागे फिरला आणि आमच्या रोखाने येऊ लागला. आम्ही मागे पळालो. नाग वाटेवर आला आणि क्षणात उजवीकडच्या दरीत दिसेनासा झाला. हे सारे उण्या पुर्‍या ४-५ सेकंदात घडले. आमच्या सगळ्यांचे अंदाज सपशेल चुकवत वीजेच्या गतीने तो नाग नाहीसा झाला. 'काळा'ला सर्पाची उपमा का देतात ते तेव्हा कळले.

जंगलात एवढ्या जवळून नाग पहायची माझी ही पहिलीच वेळ होती. त्या २ मिनिटांच्या काळात रोमांच, भीती, आनंद सगळ्या भावना एकमेकात मिसळल्या होत्या. तो नागही एवढा सुंदर होता. चमकणारे शरीर, फण्यावरचा १० चा अकडा, डुलण्यातली ऐट, चालीतील चपळता... रूपगर्वितेला शोभावा असाच सारा थाट. मी नंतर निखिलला म्हटलेसुद्धा, "नाग कसला, नागीणच असणार ती!!!". शेवटी तो मंदोदरी, उलपीचा वंश.



आमचा सारा थकवा एका क्षणात नाहीसा झाला होता. यानंतर पूर्ण ट्रेकभर नाग पाहिलेल्यांपैकी कोणीही थकले नाही.

वाट चुकल्याने आम्ही गडाला एक वळसा मारला. (वाट शोधणारे आम्ही ५ जण सोडलो तर बाकीचे मात्र न चुकता गडावर पोचले.;) ) एका टोकावरून गडाच्या कुशीतून जाणारी कोकण रेल्वे दिसली.



झाडाझुडूपातून माग काढत शेवटी आम्ही पुन्हा मुख्य वाटेवर पोचलो. गडाचा दरवाजा बुरुजामागे लपलेला आहे. तो उंचीला कमी पण गोमुखी आणि रेखिव आहे. या दरवाज्यावर पूर्वी शरभचे शिल्प होते. काळाच्या ओघात ते पडले. दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्याबाजूच्या एका कोनाड्यात हे शिल्प आता ठेवलेले आहे. शरभला सहसा पंख नसतात पण इथे त्याला पुढे दोन आणि मागे दोन असे चार पंख दाखवलेले आहेत.



आपल्या पूर्वजांची कल्पनाशक्ती अचाट होती. त्यांनी गंडभेरूंड, शरभ असे अनेक काल्पनिक प्राणी निर्माण केले. मात्र परदेशात ड्रॅगन, युनिकॉर्न यांना जसे लोककथांमध्ये स्थान मिळाले तसे गंडभेरूंड किंवा शरभाला का नाही मिळाले देव जाणे! पूर्वजांचा पराक्रम सांगणारे हे प्राणी कसे काय विलुप्त झाले काय माहीत?

आम्ही पहिल्यांदा उत्तर बुरूजावर गेलो. हा बुरूज आजही भक्कमपणे उभा आहे. इथेच झेंड्याची काठी लावली आहे. इथून उत्तरेकडील मिर्‍या डोंगर दिसतो. शिवाजी राजांनी नामदार खानाचा याच मिर्‍या डोंगरावर बिमोड केला होता.

डोलकाठी आणि मागे मिर्‍या डोंगर



बुरूजाच्या मागे जुन्या वाड्याचे अवशेष आहेत. एक तोफसुद्धा इथे पडलेली आहे. पूर्वेला 'कुंडलिके'चे वळणावळणाचे विस्तीर्ण पात्र दिसते.

कुंडलिका



इथून मागे फिरलो आणि दक्षिणेकडे आम्ही निघालो. वाटेत एक प्रचंड तलाव लागला. ताशीव दगडात बांधलेला हा तलाव १२ कोनांचा आहे. आत उतरायला सुरेख पायर्‍या बांधलेल्या आहेत.

द्वादशकोनी तलाव



आता या तलावावर मोठमोठ्या बेडकांचे राज्य आहे.



तलावाच्या पुढे नुकतेच जिर्णोध्दार केलेले छोटेखानी देऊळ आहे. देवळाच्या पुढ्यात गणपती आणि भैरवाची रेखीव मूर्ती आहे. गाभार्‍यात महादेवाची पिंड आणि समोर नंदी आहे.

इथूनच खाली गडाच्या दक्षिणेकडील बुरूजाचा निम्मा बुजलेला दुसरा दरवाजा लागतो. दरवाज्याच्या कमानीतून दिसणारे दृश्य एखाद्या परिकथेला शोभावे असेच आहे. आत तुडुंब पाण्याने भरलेले पाण्याचे सहा मोठे कुंड आहेत. ते एकमेकांत गुंफलेले असल्याने एका कुंडातून दुसर्‍या कुंडात झुळूझुळू पाणी वाहात असते. कुंडामधून चालायला फरसबंदी मार्ग आहेत. अशी कुंड विसापूर सारख्या इतरही गडांवर दिसतात. पण 'अवचित'चा विशेष असा की या कुंडाच्या सभोवतीने पांढर्‍या चाफ्याचे प्रचंड वृक्ष लावलेले आहेत. तेही ओणवे होऊन अपली मायेची सावली कुंडांवर अंथरतात.



पाच कुंडांच्या मधल्या सीमारेषेवर घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबासदृश्य देवाची काळ्या पाषाणामधील मूर्ती आहे. चौथ्या कुंडाजवळ एका आयताकृती सुट्या दगडावर शिलालेख कोरलेला आहे. (बराच पुसट झाला आहे. प्रयत्न करूनही तो आम्हाला वाचता आला नाही.) शिलालेखाच्या मागेही ढाल-तलवार धरलेला योध्दा आहे. डावीकडे तटाच्या मजबूत भिंतीने हा जलमहाल बंदिस्त झालेला आहे.



हसरा योद्धा



इथून पुढे गेल्यावर दक्षिणेचा बुरूज लागतो. याचा दरवाजा आता ढासळलेला आहे. बुरुजावरती जायला पायर्‍या आहेत. इथेही बुरुजाचे बांधकाम कधी पूर्ण झाले हे सांगणारा शिलालेख आहे. त्याच्या नुसार कोणत्यातरी (सनाच्या बाबतीत संशोधकांचे नेहमी होतात तसे आमचेही मतभेद झाले. ;) ) गुढीपाडव्याला बुरुज बांधून पूर्ण झाला.



इथून पूर्वेला रायगड दिसतो.

तासाभरात गड उतरलो. गाडीचे चाक एव्हाना ड्रायवरने गावकर्‍यांच्या मदतीने बाहेर काढले होते. मात्र चाकाबरोबर आम्ही आणलेले 'फ्रुटखंडा'चे डबेही बाहेर निघून गुप्त झाले होते. गावकर्‍यांनी आम्ही यायची वाट न पाहता चाक काढण्याच्या मदतीसाठीचा हा बक्षिससमारंभ आधीच उरकला होता. भूक तर फार लागली होती. मग रोह्याला आल्यावर सगळ्यांसाठी आम्रखंड घेऊन दुधाची तहान ताकावर भागवली.

शेवटी ताम्हीणीतून तैलबैला आणि मुळशीचा सूर्यास्त पाहात पुण्याला परतलो.



छायाचित्रे:
१. निखिल परांजपे
२. पुष्पेंद्र अरोरा

संदर्भः "चला ट्रेकिंगला" - पांडुरंग पाटणकर

Friday, August 27, 2010

उत्तरकाशी - डोडीताल - यमुनोत्री ट्रेक

गेल्या आठवड्यात 'उत्तरांचल'मधला उत्तरकाशी - यमुनोत्री हा ५ दिवसाचा ट्रेक कंपनीमधील २१ जणांनी केला. गेल्या दोन महिन्यांपासून या ट्रेकची तयारी सुरु होती.

पहिला दिवस
१४ ऑगस्टला सारेजण पुण्याहून निघालो. विमानाने दिल्ली. माझा हा पहिलाच विमान प्रवास होता. तेव्हा पहिल्यांदाच समजले..की..

आकाश के उस पार भी आकाश है...



दिल्ली विमानतळावरून बस आणि मट्रोने प्रवास करून आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोचलो. दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापन अप्रतिम आहे.
जर तुम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर आहात आणि तुमच्याकडे ३-४ तासांचा वेळ आहे तर काय कराल?
फार विचार करू नका. इथून १० मिनिटांच्या अंतरावर 'पराठेवाली गली' आहे. आम्ही सरळ या 'गली'चा रस्ता धरला. इथे नाना प्रकारचे पराठे मिळतात. अगदी आलू, मेथीपासून पनीर, पापड, काजूपर्यंत..



जवळजवळ सगळ्या प्रकारच्या पराठ्यांवर ताव मारून आणि लस्सी पिऊन आम्ही लाल किल्ल्याकडे निघलो. १५ ऑगस्टमुळे किल्ला बंद होता. मग बस पकडून 'इंडिया गेट' गाठले.





रात्री ट्रेनने आम्ही हरिद्वारला गेलो.

दुसरा दिवस

हरिद्वार.



हरिद्वारला फार वेळ न घालवता सकाळीच आम्ही उत्तरकाशीची बस पकडली. हा घाटाचा रस्ता कापायला ६ तास लागतात. घाटातून कळू लागते की आपण निसर्गाच्या अगदी कुशीत शिरत आहोत.



इथे पाण्याला ओढ फार. अगदी साधा इवलासा ओढासुद्घा घनगंभीर आवाज करत असतो.
आणि ही तर खळाळणारी भागीरथी. खोल दरीमधूनही हिचा आवाज स्पष्ट कानी येत होता.



घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यांचा पसारा बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरु होत होती.



उत्तरकाशीला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले आहे. चहू बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शहर म्हणजे दुसरा स्वर्गच आहे.



(पर्बतों के पेड़ों पर शाम का बसेरा है, सुरमई उजाला है, चम्पई अंधेरा है)



(दोनों वक़्त मिलते हैं दो दिलों की सूरत से, आस्मा ने खुश होके रँग सा बिखेरा है)



उत्तरकाशीला अनेक देवळेही आहेत. या गावाला काशीचे महत्व ज्यामुळे मिळाले ते हे विश्वेश्वराचे देऊळ. आत भव्य पिंड आहे.



याशिवाय विष्णू, हनुमान, परशुराम, राम यांची देवळेही पाहण्यासारखी आहेत.

तिसरा दिवस

आजपासून आमचा ५ दिवसांचा ट्रेक सुरु होणार होता. सकाळी लवकर आम्ही उत्तरकाशी वरुन 'संगमचट्टी'ला निघलो. साथीला भागिरथी होतीच...



आणि आता तर अंतरही कमी होते.



संगमचट्टीहून पुढे रस्ता नसल्याने गावातून पोर्टर व खच्चर भाडय़ाने घेऊन त्यावर सामान लादून खरा ट्रेक सुरू झाला. आपल्याजवळ असलेल्या पाठपिशवीमध्ये पाणी, टॉर्च, बिस्किीटे, रेनकोट व एक ड्रेस एवढे सामान आवश्यक असत. कारण, मध्येच कुठे दरड कोसळून अडकून पडल्यास मदत मिळेपर्यंत राहावे लागते. संगमचट्टीवरून ६ किमीचा ट्रेक करून आम्ही अगोडा या गावी पोचलो. वाटेत अनेक सुंदर ओढे/धबधबे लागले.



अगोड्याला जळवांचा त्रास फार झाला. प्रत्येकाच्या बूटांवर कमीतकमी ७-८ जळवा तरी निघाल्या. इथेच आम्हाला अजून एक नवा साथीदार मिळाला. नाव टायगर. :)



इथून पुढे पूर्ण ट्रेक संपेपर्यंत टायगर आमच्या सोबत होता.

चौथा दिवस

आज १४ किमीचा ट्रेक पूर्ण करून 'डोडीताल'ला पोचयचे होते. सकाळी मस्त धुके पडले होते.



अगोड्याहून डोडीतालला जाणारा रस्ता मात्र पक्क्या दगडांनी बांधलेला आहे. दुपारी डोडीतालला पोचलो तेव्हा पाऊस सुरु होता. डोडीताल सरोवरातून अन्नपूर्णा नदी वाहते.



डोडीतालच्या सरोवराचे काय वर्णन करावे? इतका सुंदर देखावा की देहभान हरपते.





सरोवराच्या सभोवती दगडी मार्ग आहे. याच्या वरून पूर्ण सरोवराला प्रदक्षिणा घालता येते.





काठावर अन्नपूर्णेचे देऊळ आहे.



या रमणीय प्रदेशानून पाय आणि मन दोन्ही हलत नव्हते. पण पुढे जाणे भागच होते.



पाचवा दिवस

आज सर्वाच उंच पॉईंट (दारव्हा टॉप)पर्यंत जायचे होते. दारव्हा टॉप ची उंची १३,५४६ फूट असून सभोवताल बर्फाच्छादित स्वर्गारोहणी, बंदरपुच्छ, ग्वाली हिमशिखरे आहेत. या सर्वात कठीण ट्रेकसाठी सकाळी निघून अन्नपूर्णा नदीच्या काठाकाठाने डोंगर चढण्यास सुरुवात केली.

अनेक ठिकाणी साखळी करून अन्नपूर्णा पार करावी लागते. टॉपवर थंडगार बर्फाचे वारे वाहत होते. खाली अद्भुत फुलांचे ताटवे, फुलले होते.



पण आता मात्र हळूहळू सगळ्यांना त्रास होऊ लागला. जास्त उंचीवर प्राणवायू कमी असल्यामुळे श्वास घेताना त्रास होत होता. किंचित डोके दुखु लागले, भूक गेली, हालचाल करण्यास त्रास होऊ लागला. वातावरण पावसाळी असल्याने बर्फाच्छादित हिमशिखरेही दिसत नव्हती. तेव्हा थोडे खाली येउन आम्ही तंबू ठोकण्याचा निर्णय घेतला. जागा तर पहा...





सहावा दिवस

आज सर्वात कठीण ट्रेक अनुभवायला मिळाला. आता एवढय़ा उंचावरून खाली हनुमानचट्टीकडे जायचे होते. या मार्गावरची पुढची कॅम्प साईट सीमा, १८ कि.मी. आहे. हिमशिखरांपासून बर्फ वितळून निघणाऱ्या नद्या व लहान मोठे प्रवाह, ओलांडण्यासाठी पूल नसल्यामुळे डोंगर उतरून दरीत नदीवर तात्पुरते ठेवलेले लाकडी ओंडके, पूल, नदीतील खडक इत्यादीवरून चालत जाऊन नद्या ओलांडाव्या लागतात. पुन्हा डोंगर चढून व उतरून दुसरी नदी ओलांडावी लागते.

हे सारे टाळण्यासाठी आम्ही सीमाला न जाता शॉर्ट कटने जंगलातून सरळ हनुमानचट्टीला जायचे ठरवले.
हा अत्यंत अवघड रस्ता होता. एक-एक पाऊल टाकणे कठीण झाले असूनही मध्ये थांबणे शक्य नसल्यामुळे चालतच राहावे लागते. मात्र, दोन्ही बाजूच्या खोल-खोल दऱ्या, हिरवे उंच डोंगर, खालून जाणारे ढग, मध्येच दिसणारे फुलांचे ताटवे या स्वर्गीय वातावरणात देहभान हरपते.





संध्याकाळी हनुमानचट्टीला पोचल्यावर अंगात त्राणही उरले नाही. टायगरची ते अशी अवस्था झाली होती.



सातवा दिवस

हनुमानचट्टीपासून जानकीचट्टी १० किमी अंतरावर आहे. इथे बसची सोय आहे पण आम्ही मात्र हे अंतरसुद्घा चालत जायचे ठरवले. इथूनच घोड्यावरूनसुद्धा पुढे जाता येते.



शेवटी समारोप म्हणून ‘यमुनोत्रीचा’ सहा कि.मी. ट्रेक केला. हा संपूर्ण रस्ता क्राँक्रिटच्या पायऱ्यांचा असून अरुंद आहे. त्यातच घोडे, पिट्टू, पालख्यांची गर्दी असते.



इथून पुढे वाहने जात नाहीत. भाविकांना हा ट्रेक करावाच लागतो. या वाटेवर बसण्याची, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे.



यमुनोत्री



यमुनोत्री मंदिरात यमुनेची सावळी आणि गंगेची गोरी मूर्ती आहे. जणू यमुनेवरचे राधा-कृष्णच...
मंदिराच्या मागे गरम पाण्याची कुंड आहेत. या कुंडांमुळेच या स्थानाला हे महत्व मिळाले आहे.

आठवा दिवस

जानकीचट्टीच्या मुक्कामात आम्हाला समजले की यमुनोत्री मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. आणि मार्ग बंद होण्याच्या वाटेवर आहे. पण परत जायला कोणतीही गाडी मिळत नव्हती. कशीबशी गाडी मिळली पण ती सुध्दा दरड कोसळल्याने हनुमानचट्टीपर्यंत येवू शकली नाही. मग पुन्हा ट्रेक सुरु झाला. घाटातून परत ६ किमी चालून आम्ही राणाचट्टीला पोचलो. इथे तर १०-१२ मीटर रस्ताच खचला होता.



राणाचट्टीवरून बारीकोट - नौगाव मार्गे देहरादूनला जायचे होते. इथे परत नवी गाडी मिळण्याला बराच वेळ गेला. राणाचट्टी ते बारीकोट हे ४० किमी अंतर पार करायला आम्हाला तब्बल ६ तास लागले. का? फोटोत पहा.



या ४० किमी रस्त्यकिमी सुमारे १० किमी सलग दरड कोसळली होती. बराचसा रस्ता साफ केला असला तरी दगड, चिखल यातून वाट काढत जाणे फार जोखमीचे होते.



नौगाव देहरादून मार्गसुद्धा घाटाचाच. रात्री उशीरा देहरादूनला पोचलो. तेव्हा कुठे थोडे बरे वाटले.

टीपः भटकंतीचा खूप अनुभव नसेल तर शक्यतो पावसात हिमालयातील ट्रेक टाळलेलेच चांगले.