Sunday, May 29, 2011

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

’बर्गन’- नॉर्वेमधील ऑस्लो नंतरचे सर्वात मोठे शहर. ११-१२व्या शतकात या शहराला उत्तर युरोपाच्या राजधानीचा दर्जा मिळाला होता. सात टेकड्यांच्या कुशीत वसलेले हे बंदर त्याच्या भौगोलिक रचनेमुळे मानवी वस्तीसाठी आदर्श ठिकाण आहे. टेकड्यांवरुन सुर्यकिरण परावर्तित होत असल्यामुळे हा भाग कडाक्याच्या हिवाळ्यातही उबदार राहतो. शहराच्या आजूबाजूला जेव्हा हिम साठलेले असते तेव्हा शहरात मात्र हिरवळ दिसू शकते. पण थंडीची कमतरता इथे पावसाने भरुन काढलेली आहे. इथे खूप पाऊस पडतो. इतका की. २००७ साली इथे सलग ८५ दिवस पाऊस पडत होता. आणि त्यामुळेच की काय इथली आजूबाजूची झाडी सदाहरित जंगलांची आठवण करुन देते.

आम्ही बर्गनला पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजून गेले होते. पुढचा पूर्ण दिवस हातात होता. दिवस उन्हाळ्याचे असल्याने सूर्यही निदान साडे नऊ पर्यंत मावळणार नव्हता. बर्गन पहायला हा वेळ पुरेसा नसला तरी या शहराची चव घ्यायला मात्र नक्कीच जमणार होते.

बर्गन गल्ली-बोळांचे शहर आहे. टेकड्यांमध्ये वसलेले असल्याने प्रचंड चढउतार. तसे म्हणा, नॉर्वेला सपाट प्रदेश मुळी मिळालाच कुठे आहे? आपल्याकडे सह्याद्री आणि हिमालय यांच्यातील भूभाग समजा गायब झाला तर जी अवस्था होईल तीच नॉर्वेची अवस्था आहे. गल्लीबोळांतून आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. जुन्या धाटणीच्या युरोपियन इमारतींच्या जुडग्यात आमचे हॉटेल होते. समोर छान बाग आणि बागेत इवलेसे तळे.

(आमचे हॉटेल)


हॉटेलचा मालक, ’लासा’ त्याचे नाव, खूप मृदु, आतीथ्यशील होता. एका नागमोडी जिन्यावरुन आम्ही वर गेलो. त्याने आम्हाला आमची खोली दाखवली. बाकी गोष्टी समजाऊन सांगितल्या. आम्ही सामान टाकले आणि बाहेर पडलो. सोबत शहराचा नकाशा होताच. तो पाहात आम्ही पोचलो ’फ्लोइएन’ डोंगरावर जाणा-या ’फ्लोइबानन फ्युनिक्युलर’च्या बोगद्यात. ही एक पिटुकली ट्रेन आहे. बर्गनच्या सर्वात उंच टेकडीवर म्हणजेच ’फ्लोइएन’ डोंगरावर ही ट्रेन ५ मिनिटात नेते. या ट्रेन लाईनची रचना अभ्यासण्यासारखी आहे. 'पुली'चा उपयोग करुन एकाच वेळी २ ट्रेन चलतात. एक वर जाणारी आणि दुसरी खाली येणारी. परिणामी या ट्रेन चालवण्यासाठी खूप कमी उर्जा लागते.

(’फ्लोइबानन फ्युनिक्युलर’)




टेकडीवरुन बर्गनचा नजारा अफलातून दिसतो. बर्गनचा मध्यभाग बराचसा आटोपशीर आहे. त्यामुळेच हे शहर नॉर्वेच्या इतर कोणत्याही शहरापेक्षा जास्त जिवंत वाटते. दूरवर पसरलेल्या इमारती, बागेतली थुईथुई कारंजी, वाहणारे रस्ते, आणि बंदरात दाटीवाटीने उभ्या असणा-या बोटी.

(बर्गन)






टेकडीवर गर्द झाडी आहे. उंच उंच झाडे, जागोजागी वाहणारे झरे, कॅंपिंग करायला आदर्श जागा. इथे एक तंबूही लावलेला दिसला. टेकडीवर फिरायला घेऊन जाणा-या ब-याच वाटा दिसत होत्या. पण वेळ कमी होता. आम्ही टेकडी उतरलो. फिशमार्केट मधून चालत चालत बर्गच्या किल्ल्यात गेलो. बंदराच्या तटाला लागूनच हा किल्ला आहे. २-३ इमारती चांगल्या शाबूत दिसल्या. बाकीचे भग्न अवशेष. दुस-या महायुद्धात नाझी सैनिकांनी इथेच त्यांचा तळ ठोकला होता. आता पूर्ण किल्ल्याचे बागेत रुपांतर केलेले आहे

(फिशमार्केट - ब्रिग्गेन)


(किल्ला)


आता अंधार पडायला लागला होता. आम्ही परत निघालो. जाताना बर्गनच्या मुख्य चौकात आम्हाला मुलामुलींचा एक ग्रुप चक्क गल्ली क्रिकेट खेळताना दिसला. आम्हीही मग थोडी ’फिल्डिंग’ केली.



वाटेवरच एक उंच कॅथेड्रल होते. आम्ही तिथे थोडे रेंगाळलो. तिथे आम्हाला दोन माणसे एका विचित्र उपकरणाशी खेळताना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर ते एकदम ओळखीचे निघाले. बघा, तुम्हाला ओळख पटते का?

(ओळख पटते का?)


आमची जिज्ञासा पाहून त्यातील एकाने (थॉमस त्याचे नाव) ते हेलिकॉप्टर व्यवस्थित दाखवले. ते कसे काम करते, हे समजाऊन सांगितले. थॉमसने स्वतः त्याचे सगळे भाग विकत घेऊन जोडले होते. त्याच्या मध्यभागी त्याने एक कॅमेरा बसवला होता. त्याचे कंट्रोल सगळे जमिनीवरुन देता येतील असे दुसरे यंत्र त्याच्या हातात होते. थॉमसने हेलिकॉप्टर उडवले. आणि तो फोटो काढू लागला. बराच वेळ त्याचा हा कार्यक्रम सुरु होता.

(जोहान्सन चर्च थॉमसच्या कॅमे-यातून)


त्याने काढलेली इतर छायाचित्रे या दुव्यावर पाहता येतील.

त्याचा निरोप घेऊन आम्ही निघालो. हॉटेलवर आलो. रोज दमून गाढ झोपायची आता सवय झाली होती.

(क्रमशः)

नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)

Wednesday, May 11, 2011

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

रात्री झोपायला उशीर झाला. (केला!) परिणामी तिस-या दिवशी सकाळी उशीरा उठलो. खिडकीतून हलणा-या पाण्याच्या ऐवजी एक भिंत दिसत होती. बोट कोणत्यातरी बंदरावर लागली होती. पटकन अवरले आणि डेक वर आलो. बोट तोवर समुद्रात घुसली होती. आजचा समुद्र थोडा अवखळ होता. एखाद्या बागडणा-या मुलासारखा. आज लाटा दिसत होत्या. एका बाजूला दूरवर जमीन आणि दुस-या बाजूला क्षितीजापर्यंत पसरलेले पाणी.



वारासुद्धा भरात आला होता. बोटीच्या समोरच्या भागात इतका वारा होता की उभेही राहता येत नव्हते. खूप थंडी होती. वातावरणही ढगाळ होते. कालपर्यंत सूर्याकडे तोंडकरुन बसलेले गोरे आजी आजोबा आज मस्त शाल लपेटून, गुरफटून आत बसले होते. डेकवर तुरळक माणसे दिसत होती.

आता पोटात कावळे ओरडत होते. आम्ही बोटीवरल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे आमच्या न्याहरीची उत्तम सोय केलेली होती.



फ्लेक्सचे ४७ प्रकार, योगर्टचे १३ फ्लेवर, २३ प्रकारचे चीज, ३८ प्रकारचे ब्रेड, ५७ प्रकारचे ज्युस आणि जॅम. शिवाय मांसाहारी पदार्थ वेगळे (ते मोजले नाहीत, नाहीतर वेळ संपल्याने न्याहरी ऐवजी दुपारचे जेवण झाले असते.) काय घेऊ आणि काय नको असे झाले होते. शेवटी सगळेच एकत्र केले. आणि उदराग्नी शांत केला.

आम्हाला १० वाजता खोली खाली करायची होती. आम्ही सामान आवरले आणि लॉकर रुम मध्ये टाकले. पुन्हा डेकवर जाऊन सोसाट्याच्या वा-याला झोंबू लागलो. डाव्या बाजूला मधूनमधून छोटी छोटी गावे येत जात होती.



बोटीवरचा आता थोडावेळच राहिला होता. परत एकदा सगळीकडे फिरलो. वाचनालय, चित्रपटगृह, रेस्टॉरंट. वाचनालयात ’क्रिपेज’ नावाचा पत्त्याचा डाव एका टेबलावर रंगला होता, माणसे ब्रिटिश होती. दुसरीकडे डच लोक ’पोकर’ खेळत होते. आम्ही पत्त्यात दाखवलेल्या जिज्ञासेमुळे मग खरा “गेम” कोणता यावर ब्रिटश-डच “संवाद” झाला, त्याचे महाचर्चेत रुपांतर होण्यापूर्वीच आम्ही तिथून सटकलो. :)

(वाचनालय)


(हॉटेल)


बोट हळूहळू एका मोठ्या बंदरात येउ लागली होती, एकदम लहान-मोठ्या नौकांची गर्दी होऊ लागली होती. हळू हळू बंदराचा तट दिसू लागला. बोट धक्क्याला लागली. विमानातून जसे आपण वरच्यावर एअर पोर्ट्वर उतरतो. तसे आम्ही बोटीच्या चौथ्या मजल्यावरुन बाहेर पडलो. दारावर उभ्या रिसेप्शनिस्टने हसून सांगितले, “’बर्गन’मध्ये तुमचे स्वागत आहे!!”

(क्रमशः)

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)

Sunday, May 8, 2011

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

सकाळी दहाला आम्ही धक्क्यावर पोचलो. ’हार्तिग्रुतेन’ तिथे आधीपासूनच आमची वाट पहात होती. बोट कसली एक शहर होते ते सातमजली. त्यात हॉटेल होते, चित्रपटगृह होते, रेस्टॉरंट होते, वाचनालय होते. (मला भावलेली गोष्ट म्हणजे वाचनालयात एक रंगपेटीही होती, चित्रे काढायची सोय होती), आणि सगळ्यात महत्वाचे खिडकीतून दिसणारे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलत होते. कल्पनेपेक्षाही सुंदर होत होते. बोटीत प्रवेश करताच हे सारे पाहून मी तर भारावूनच गेलो.

आम्हाला तळातली एक रुम मिळाली होती. तिला २ गोल खिडक्या होत्या. (टिपिकल बोटीला असतात तश्या) बोट सुरु झाल्यावर त्यातून समुद्राचे मागे पळणारे पाणी दिसत होते. शिवाय एक सोफा जो बेड होऊ शकतो, अजून एक बेड, लिहिण्याचे टेबल, कपडे ठेवायला कपाटे आणि बाथरुम, एकंदरित थाट!

बोट निघाली तसे आम्ही सामान टाकले आणि सगळ्यात वरच्या डेकवर पळालो. तिथे आधीपासूनच अनेक गोरी माणसे आपला धीर-गंभीर चेहरा सुर्याकडे करुन बसली होती. बोटीवरचे सरासरी वय साठच्या पुढे असावे. (घोर निराशा!) पण ही निराशा काही फार वेळ टिकले नाही, कारण सोबतीला दोन चिरतरुण गोष्टी होत्या. पहिला निळाशार समुद्र आणि दुसरा त्याचाच थोरला भाऊ निळेभोर आकाश.



(सुनिल नभ हे, सुंदर नभ हे, नभ हे अतल अहा...
सुनिल सागर, सुंदर सागर, सागर अतलचि हा...)


काल दूरवर दिसलेले “मॉंक आयलॅंड” आज एकदम जवळ आले होते.



बोट हळूहळू वेग पकडत होती, सागर एकदम शांत जणू तो समुद्र नव्हताच एक तळेच होते मोठ्ठाले. पाणीही इतके स्वच्छ की तळ दिसत होता. आणि आम्ही बोटीत नसून जमिनीवरच आहोत असे वाटत होते. बोटीचा आवाज सोडला तर इतर कोणताही आवाज नव्हता. आणि बोटीमुळे होणारी पाण्याची लवथव सोडली तर इतर कोणतीही हलचाल नव्हती.

(उमजे ना हे कुठे नभ कुठे जल सीमा होऊनी..
नभात जल ते जलात नभ ते संगमूनी जाई..)


’ट्रोन्डॅम’पासून बाहेर पडणारे वाट चिंचोळी आहे. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी दिसत राहते. आणि मधून मधून वसलेली छोटी छोटी गावे. बोटींना वाट दाखवणारे दीपस्तंभ. आणि पसरलेली हिरवळ.











थोडेसे बाहेर पडल्यावर अजून उंच डोंगर दिसू लागले, त्यांच्या शुभ्र टोप्या, आणि काळे कातळ, त्यांचे स्वाभाविक रंग सोडून सागराच्या आणि आकाशाच्या रंगासारखे श्यामवर्णी भासत होते. संध्याकाळी बोट एका मोठ्या धक्क्याला लागली, खास “बोटकरां”साठी तिथल्या एका उंच हॉटेल मधल्या गॅलरीमधे एक वादक सेक्सोफोन वाजवत होता. समोर गगनाला भिडणारे पर्वत , त्याला वळसे घालून येणारी मावळतीची किरणे, आणि सोबतीला हुरहुर लावणारे सेक्सोफोनचे सूर. आयुष्यात फार थोड्या संध्याकाळी अश्या असतात.









रात्री बोटीवरील रेस्टॉरंट मध्ये गाण्याचा कार्यक्रम झाला. २ कलाकारांनी मिळून केलेल्या या कार्यक्रमात इंग्रजी, नॉर्वेजिअन, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच अनेक भाषांमधील गाणी होती. रात्री १२ ला बोट आलेसुंद या गावी आली.
झोपायला रुममध्ये आलो तेव्हा झोपावेसे मुळीच वाटत नव्हते. शरीर थकले होते पण मन मुळीच भरले नव्हते.


(क्रमशः)

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)

Sunday, May 1, 2011

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... ’मितान’ताईंचे हे लेख जेव्हा वाचले होते तेव्हापासूनच नॉर्वेला जायचे आणि तिथे द-यां-डोंगरातून फिरायचे पक्के ठरवले होते. उन्हाळा सुरु व्हायचीच वाट पहात होतो. आणि तो जसा सुरु झाला तसे “इस्टर” चे निमित्त साधून “नॉर्वे इन अ नटशेल”चे आरक्षण केले.

’ट्रोन्डॅम’ला जाण्यासाठी ऑस्लोवरुन ट्रेन वेळेत सकाळी ८ वाजता निघाली. आम्हाला बरोबर “विंडो सीट विथआऊट विंडो” मिळाली होती. म्हणजे दोन खिडक्यांमधली जागा, जिथे ना धड पुढचे दिसते ना मागचे. पण थोड्याच वेळात सुचना देण्यात आली ’हमर’ ते ’लिलेहमर’ ही रेल्वेलाईन बंद असल्याने सर्व प्रवाश्यांना हा प्रवास बसने करावा लागेल. आणि पुढे ट्रेन बदलावी लागेल. “वा!, आता जागा बदलता येईल!” मी मनातल्या मनात खुष झालो. युरोपातला “रेल्वेप्रवास” म्हणजे काय सांगावे?! आरामदायी आसन, सुसज्ज उपहारगृह, सामान ठेवण्यासाठी वेगळी जागा हे सारे ठीकच, याला सोबत म्हणून की काय.. बाहेर खुलत जाणारा निसर्ग... आणि तो पहाता यावा यासाठी केलेल्या काही खास सीट. तिथे कोणीच बसले नव्हते, मग काय? उठून जागा काबीज केली.

बाहेर निसर्ग कात टाकत होता, वसंत आपली जादू दाखवत होता. गेले सहा महिने बर्फात लपून बसलेली गवताची पाती, सुर्यदर्शनाने फार थोड्या कालावधीत हिरवीगार झाली होती. इतके दिवस निष्पर्ण राहिलेली झाडे कोवळ्या कोवळ्या पानांनी भरुन गेली होती, उतावीळ फुले सुर्याला न्याहाळत होती. आठ महिने बर्फात राहिलेल्या या वनस्पतींना कसेबसे ४ महिने मिळतात फुलायला. पण त्या चार महिन्यांमधे ते सगळी कसर भरुन काढतात. इतके रंग उधळतात की पृथ्वीवरच स्वर्ग अवतरतो. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले होते. ठिकठिकाणी बियाणी मांडून ठेवली होती. एक रस्ता सतत रेल्वेशी लपाछपी खेळत होता.



’हमर’ला ट्रेन सोडली. बसमधे बसलो, तिथून ’लिलेहमर’. मग पुन्हा ’विंस्त्रा’ नावाच्या स्टेशनवर ट्रेन बदलायची होती. इथली स्टेशन म्हणजे एक छोटी घरासारखी इमारत. तिच्या समोर फलाट, आणि त्याला लगटूनच मुख्य रस्ता. कधी फलाट संपतो आणि कधी रस्ता सुरु होतो, समजत नाही.



या स्टेशनवरच एका स्वच्छंदी तरुणाचा पुतळा होता. त्याच्या देहबोलीतून आमच्याच मनातली भावना प्रकट होत होती. निसर्गाची विविध रुपे पाहून इतका आनंद होत होता की मोठ्याने ओरडावेसे वाटत होते. (पण तसे केले मात्र नाही, आजूबाजूला ’सभ्य युरोपियन’ होते ना!)



इथून पुढे आम्हाला मस्त खिडकीची जागा मिळाली. आणि कॅमे-याचा क्लिक-क्लिकाट सुरु झाला.





पांढरे हिम, करडे दगड, आणि नुकतेच फुटलेले हिरवे अंकुर. मधून मधून साचलेली तळी, आपण चित्रात काढतो तशी दारे-खिडकी असणारी घरे, दोन्ही बाजूला हिमाच्छादित डोंगर आणि मधून धावणारे वळणावळणाचे रुळ. काय थाट होता तो सारा!



रेल्वे मध्येच ’ट्रोन्डॅम’ला जाणा-या एका काकूंशी आमची ओळख झाली. त्यांनी “ऑस्लो ते ट्रोन्डॅम” हा प्रवास शंभरवेळातरी केला असेल. “मला एकदाही या प्रवासाचा कंटाळा आलेला नाही” इति काकू. आणि खरेच होते ते. बोलता बोलता काकूंनी त्यांचे नाव त्रुदा आहे असे सांगितले. त्या मुळच्या ऑस्लोच्या, पण जेव्हा “ट्रॉन्डॅम”ला पहिल्यावेळी आल्या तेव्हाच या गावाच्या प्रेमात पडल्या. लग्नानंतर तिथेच स्थायिक झाल्या. हे सारे ऐकल्यावर ट्रॉन्डॅम बद्दलची उत्सुकता अजूनच वाढली.
वाहनांच्या अदलाबदलीमुळे ट्रॉन्डॅमला आम्ही दीड तास उशीरा पोचलो. रेल्वेमधून ट्रॉन्डॅम बरेच मोठे शहर वाटले, टेकट्य़ांमध्ये पसरलेले. दूर दूर वर घरे दिसत होती. आणि डाव्याबाजूला शांत समुद्रकिनारा.
त्रुदानी आम्हाला हॉटेलचा रस्ता दाखवला. तिचे घर वाटेतच होते. इथल्या शहराच्या सगळ्यात जुन्या आणि मध्यवर्ती भागाला “बक्कलादेत” (टेकड्यांचा प्रदेश) म्हणतात. या भागात सगळी लाकडी घरे आहेत, दुकानेही तशीच. काही घरे खूप जुनी आहेत. नॉर्वेमधील इतर अनेक शहरांसारखेच हे शहरसुद्धा अनेकदा आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहे.

“बक्कलादेत” (टेकड्यांचा प्रदेश)


शहराच्या मधोमध निदेल्वा नदी वाहते. तिच्या भोवतीने अजूनही जुनी गोदामे आहेत. आता तिथे रेस्टॉरंट, दुकाने आहेत. निदेल्वा आहेच एवढी शांत आणि सुंदर की तुम्ही तिच्या प्रेमातच पडाल. त्रुदानी आम्हाला या नदीचे गाणेही म्हणून दाखवले. शब्द कळत नसले तरी सुरांमधून भाव ह्रदयाला भिडले.

(निदेल्वा नदी)


’ट्रॉन्डॅम’ला ’ट्रॉन्डॅम विद्यापीठ’ आहे. इथे सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सव्वा लाख लोकसंख्या असणा-या गावात हा अकडा बराच मोठा आहे. त्यामुळे तरुण मुले-मुली इथे भरपूर दिसातात.

(ट्रॉन्डॅम विद्यापीठ)



त्रुदाला निरोप देऊन आम्ही हॉटेलवर आलो, तिथे शहराचा नकाशा मिळला. आम्ही पटकन सामान टाकले. आणि बाहेर पडलो. ’ट्रॉन्डॅम’ला उत्तर युरोप मधील सर्वात मोठे गोथिक चर्च आहे. निदेल्वाच्या काठावरचे हे चर्च खूप सुंदर आहे. चर्चच्या दर्शनी भागावर बरेच पुतळे कोरलेले आहेत.

(चर्चवरील पुतळे)


चर्चचे वातावरण एकूणच धीर-गंभीर आणि काहीसे गूढ आहे. आम्ही चर्चच्या आत गेलो, तिथे खूप अंधार होता, सामुदायिक प्रार्थना सुरु होती. मधोमध येशूची मूर्ती तिच्या समोर एक मोठा पियानो, तो वाजवायला २ (?) माणसे, तिथला पाद्री एखाद्या भयपटाच्या खलनायकासारखा भासत होता. (ड्रॅक्युला, व्हॅयांपायर की काय म्हणतात ना तसेच!) त्यात बाहेर येऊन मागच्या बाजूला गेलो तर तिथे “गेव्हयार्ड”, आम्ही आपला तिथून काढता पाय घेतला!



ट्रॉंन्डॅमला एक छोटा किल्लाही आहे. आम्ही तिकडे कूच केले. वाटेवर कमानींचा जुना पूल लागला.



किल्ला लहान होता, छोट्या टेकडीवर, तिथून समोर समुद्र दिसत होता, आणि पायथ्याला गाव. किल्ल्याचा तट बराच पडला होता, त्याचे नूतनीकरण चालले होते. तिथे ब-याच नव्याको-या तोफा लावून ठेवल्या होत्या. आणि जुन्या इमारती नीट रंगरंगोटी करुन ठेवल्या होत्या. तळघरात काही गोदामे किंवा तुरुंग असावेत. या किल्ल्याचे दरवाजे फारच तकलादू वाटले. शिवाय ते अगदीच समोर होते. शत्रूला सहज दिसतील असे. अगदी चोर-दरवाजासुद्धा.



या शहरामधे एका उंच टेकडीवर टीव्ही टॉवर आहे. आणि त्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर “फिरते उपहारगृह”. एका तासात याची एक फेरी पूर्ण होते. आणि पूर्ण शहराचा नजारा पहायला मिळतो.

(टीव्ही टॉवर)


रात्रीचे साडे आठ वाजून गेले होते, आणि रेंगाळलेला सूर्य मावळतीला जात होता. त्याची सोनेरी किरणे परिसरला आणि आम्हाला उजळत होती.



इथून सारा परिसर दिसत होता. बंदर, रेल्वे स्टेशन, विद्यापीठ, निदेल्वा, तिचे जुने नवे पूल... दूरवर “मॉंक आयलॅंड” दिसत होते.



विस्तीर्ण समुद्र दिसत होता. तो साद घालत होता. बोलवत होता. आणि त्याचे आमंत्रण आम्ही स्वीकारले होते. उद्यापासून त्याच्याच अंगाखांद्यावर खेळायचे होते.


(क्रमशः)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)