Saturday, October 30, 2010

अवचित....

प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, कोणतेही प्रश्न तेव्हा आठवत नाहीत, सुख-दु:ख सार्‍याचा विसर पडतो. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते.

अजूनही गर्द रानाने वेढलेला अवचितगड कोकणात रोह्याच्या जवळ आहे. पुण्याहून रोह्याला जायला ४ तास लागतात. तिथून पुढे पिंगळसई किंवा मेढा या गावी यावे. या दोनही गावातून पायवाट गडावर जाते. कोकण रेल्वे या गडाला अगदी बिलगून जाते.

आम्ही पिंगळसईला साधारणपणे ११ वाजता पोचलो. पोचल्या पोचल्याच आमच्या गाडीचे चाक धरणी मातेने आपल्या पोटात घेतले. मग आमच्यातील 'हौशी' मंडळींनी ड्रायवरला 'चाक घुमाव', 'आगे लो', 'पिछे लो' अशा सुचना द्यायला सुरवात केली. पण चाक तसूभरही हलेना. वैतागून शेवटी ड्रायवरने महारथी कर्णाच्या आवेशात 'चक्रोत्धारणा'ची जबाबदारी पूर्णपणे स्वतःवर घेतली. आणि आम्ही गडावर जायला मोकळे झालो.

आमच्यापैकी कुणीच गडावर आधी गेलेले नव्हते. पिंगळसईमध्ये वाट विचारून घेतली. दिवस नवरात्राचे. सहाजिकच वाटेवर अनेक प्रकारची फुले फुलली होती. फुलांमध्ये या दिवसात केशरी-पिवळा रंग खूप दिसतो. तरी त्यातही किती विविधता. काही फुले इवलीशी, नजरेला सहज न दिसणारी, तर काही हातभर मोठी. रानभेंडीचे तर जणू पीकच बहरलेले होते.

रानभेंडी



वाघनखीची फुलेही भरपूर फुलली होती. ही फुले म्हणजे निसर्गाचे निराळेच नवल आहे. साधारणपणे फुलांची रचना ही, परागकण मध्यभागी आणि भोवती नाजूक पाकळ्या अशी असते. पण वाघनखीची गोष्टच वेगळी. झुडुपाची नाजूक डहाळी मुडपून त्यातून ज्वाळेसारख्या पाकळ्या बाहेर येतात आणि भोवतीने परागकण विखुरलेले असतात. अशा नवलाईचे हे एकमेव फूल असावे. याची पानेही तेवढीच नाजूक, मखमली, लांबोडकी आणि वेलीप्रेमाणे टोकाशी दुमडलेली.

वाघनखी (ग्लोरी लीली)



नजरेला भुरळ पाडणारे फुलांचे ताटवे दुतर्फा असले तरी वातावरण मात्र मुळीच चांगले नव्हते. वरून सुर्य आग ओकत होता. अंग घामाने निथळत होते. प्रत्येकाचीच बिकट अवस्था होत होती. जो तो आपापल्या परीने उन्हाचा ताप कमी करायचा निरर्थक प्रयत्न करत होता.



अर्ध्या तासाच्या भर उन्हातील चढाईनंतर झाडांची गर्दी वाढू लागली. वाट सुसह्य होऊ लागली. पण थकवा जाणवतच होता. बरेचसे सवंगडी मागे राहीले होते. पाऊण डोंगर चढून झाल्यावर मेढ्याकडून येणारी वाट उजव्या बाजूने येऊन मिळते. अनावधानाने आम्ही ही वाट पकडली आणि भरकटलो. या वाटेने थोडे पुढे गेलो. माझ्या पुढे निखिल आणि महेंद्र दोघेच होते.

"फणा फाहिलास का?" - निखिल

"हो रे" - महेंद्र

हे शब्द एकताच मी कान टवकारले. मला वाटले नागफणीचे फूल यांना दिसले असावे. ते पहावे म्हणून मी पळतच दोघांना गाठले. समोर पाहतो तो काय...

प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, दुसरे काहीही तेव्हा आठवत नाही. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते. तरीही तो क्षण आला होता, आमची वाट पाहात होता.

समोर एक नाग वाटेच्या डाव्याबाजूला निपचिप पडला होता. त्याने फणा पूर्ण उघडला होता. त्याची लांबी चार-पाच फूट असेल. जाडी मनगटा एवढी. हलचाल थोडीही होत नव्हती. दोन क्षण सारेच स्तब्ध झाले.



"मेलाय की काय?" - महेंद्र

"हात लावून पाहू का?" - निखिल

"वेडा आहेस का?" - मी

या संभाषणात जो काही वेळ गेला तेवढ्यामध्ये नागाच्या फण्याची थोडी हलचाल झाली. आणि तो जिवंत आहे हे सार्‍यांच्या नीट ध्यानात आले. निखिलने प्रसंगावधान दाखवून कॅमेरा काढला. तो पटापट नागाचे फोटो घेऊ लागला. २ मिनिटे होऊन गेली. पण नागराजांचा जागेवरून हलण्याचा कोणताही बेत दिसत नव्हता. मग तो तसा का पडला आहे यावर सगळे तर्क लढवू लागले.

"त्याने काही तरी गिळले असेल" - मी

"नाही, तो दबा धरून बसला असेल." - निखिल

"अरे, कात टाकत असेल." - कपिल



कोणालाच काही समजेना. मागून आमचेच २०-२५ सवंगडी गड चढत होते, परिणामी या अवस्थेत जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. शेवटी निखिल व महेंद्रने वाट शोधत पुढे जावे आणि कपिलसोबत मी मागे राहून मागून येणार्‍यांना सावध करावे असे ठरले. ते दोघे जसे पुढे गेले तशी नागाची हलचाल एकदम वाढली. तो झटक्यात मागे फिरला आणि आमच्या रोखाने येऊ लागला. आम्ही मागे पळालो. नाग वाटेवर आला आणि क्षणात उजवीकडच्या दरीत दिसेनासा झाला. हे सारे उण्या पुर्‍या ४-५ सेकंदात घडले. आमच्या सगळ्यांचे अंदाज सपशेल चुकवत वीजेच्या गतीने तो नाग नाहीसा झाला. 'काळा'ला सर्पाची उपमा का देतात ते तेव्हा कळले.

जंगलात एवढ्या जवळून नाग पहायची माझी ही पहिलीच वेळ होती. त्या २ मिनिटांच्या काळात रोमांच, भीती, आनंद सगळ्या भावना एकमेकात मिसळल्या होत्या. तो नागही एवढा सुंदर होता. चमकणारे शरीर, फण्यावरचा १० चा अकडा, डुलण्यातली ऐट, चालीतील चपळता... रूपगर्वितेला शोभावा असाच सारा थाट. मी नंतर निखिलला म्हटलेसुद्धा, "नाग कसला, नागीणच असणार ती!!!". शेवटी तो मंदोदरी, उलपीचा वंश.



आमचा सारा थकवा एका क्षणात नाहीसा झाला होता. यानंतर पूर्ण ट्रेकभर नाग पाहिलेल्यांपैकी कोणीही थकले नाही.

वाट चुकल्याने आम्ही गडाला एक वळसा मारला. (वाट शोधणारे आम्ही ५ जण सोडलो तर बाकीचे मात्र न चुकता गडावर पोचले.;) ) एका टोकावरून गडाच्या कुशीतून जाणारी कोकण रेल्वे दिसली.



झाडाझुडूपातून माग काढत शेवटी आम्ही पुन्हा मुख्य वाटेवर पोचलो. गडाचा दरवाजा बुरुजामागे लपलेला आहे. तो उंचीला कमी पण गोमुखी आणि रेखिव आहे. या दरवाज्यावर पूर्वी शरभचे शिल्प होते. काळाच्या ओघात ते पडले. दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्याबाजूच्या एका कोनाड्यात हे शिल्प आता ठेवलेले आहे. शरभला सहसा पंख नसतात पण इथे त्याला पुढे दोन आणि मागे दोन असे चार पंख दाखवलेले आहेत.



आपल्या पूर्वजांची कल्पनाशक्ती अचाट होती. त्यांनी गंडभेरूंड, शरभ असे अनेक काल्पनिक प्राणी निर्माण केले. मात्र परदेशात ड्रॅगन, युनिकॉर्न यांना जसे लोककथांमध्ये स्थान मिळाले तसे गंडभेरूंड किंवा शरभाला का नाही मिळाले देव जाणे! पूर्वजांचा पराक्रम सांगणारे हे प्राणी कसे काय विलुप्त झाले काय माहीत?

आम्ही पहिल्यांदा उत्तर बुरूजावर गेलो. हा बुरूज आजही भक्कमपणे उभा आहे. इथेच झेंड्याची काठी लावली आहे. इथून उत्तरेकडील मिर्‍या डोंगर दिसतो. शिवाजी राजांनी नामदार खानाचा याच मिर्‍या डोंगरावर बिमोड केला होता.

डोलकाठी आणि मागे मिर्‍या डोंगर



बुरूजाच्या मागे जुन्या वाड्याचे अवशेष आहेत. एक तोफसुद्धा इथे पडलेली आहे. पूर्वेला 'कुंडलिके'चे वळणावळणाचे विस्तीर्ण पात्र दिसते.

कुंडलिका



इथून मागे फिरलो आणि दक्षिणेकडे आम्ही निघालो. वाटेत एक प्रचंड तलाव लागला. ताशीव दगडात बांधलेला हा तलाव १२ कोनांचा आहे. आत उतरायला सुरेख पायर्‍या बांधलेल्या आहेत.

द्वादशकोनी तलाव



आता या तलावावर मोठमोठ्या बेडकांचे राज्य आहे.



तलावाच्या पुढे नुकतेच जिर्णोध्दार केलेले छोटेखानी देऊळ आहे. देवळाच्या पुढ्यात गणपती आणि भैरवाची रेखीव मूर्ती आहे. गाभार्‍यात महादेवाची पिंड आणि समोर नंदी आहे.

इथूनच खाली गडाच्या दक्षिणेकडील बुरूजाचा निम्मा बुजलेला दुसरा दरवाजा लागतो. दरवाज्याच्या कमानीतून दिसणारे दृश्य एखाद्या परिकथेला शोभावे असेच आहे. आत तुडुंब पाण्याने भरलेले पाण्याचे सहा मोठे कुंड आहेत. ते एकमेकांत गुंफलेले असल्याने एका कुंडातून दुसर्‍या कुंडात झुळूझुळू पाणी वाहात असते. कुंडामधून चालायला फरसबंदी मार्ग आहेत. अशी कुंड विसापूर सारख्या इतरही गडांवर दिसतात. पण 'अवचित'चा विशेष असा की या कुंडाच्या सभोवतीने पांढर्‍या चाफ्याचे प्रचंड वृक्ष लावलेले आहेत. तेही ओणवे होऊन अपली मायेची सावली कुंडांवर अंथरतात.



पाच कुंडांच्या मधल्या सीमारेषेवर घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबासदृश्य देवाची काळ्या पाषाणामधील मूर्ती आहे. चौथ्या कुंडाजवळ एका आयताकृती सुट्या दगडावर शिलालेख कोरलेला आहे. (बराच पुसट झाला आहे. प्रयत्न करूनही तो आम्हाला वाचता आला नाही.) शिलालेखाच्या मागेही ढाल-तलवार धरलेला योध्दा आहे. डावीकडे तटाच्या मजबूत भिंतीने हा जलमहाल बंदिस्त झालेला आहे.



हसरा योद्धा



इथून पुढे गेल्यावर दक्षिणेचा बुरूज लागतो. याचा दरवाजा आता ढासळलेला आहे. बुरुजावरती जायला पायर्‍या आहेत. इथेही बुरुजाचे बांधकाम कधी पूर्ण झाले हे सांगणारा शिलालेख आहे. त्याच्या नुसार कोणत्यातरी (सनाच्या बाबतीत संशोधकांचे नेहमी होतात तसे आमचेही मतभेद झाले. ;) ) गुढीपाडव्याला बुरुज बांधून पूर्ण झाला.



इथून पूर्वेला रायगड दिसतो.

तासाभरात गड उतरलो. गाडीचे चाक एव्हाना ड्रायवरने गावकर्‍यांच्या मदतीने बाहेर काढले होते. मात्र चाकाबरोबर आम्ही आणलेले 'फ्रुटखंडा'चे डबेही बाहेर निघून गुप्त झाले होते. गावकर्‍यांनी आम्ही यायची वाट न पाहता चाक काढण्याच्या मदतीसाठीचा हा बक्षिससमारंभ आधीच उरकला होता. भूक तर फार लागली होती. मग रोह्याला आल्यावर सगळ्यांसाठी आम्रखंड घेऊन दुधाची तहान ताकावर भागवली.

शेवटी ताम्हीणीतून तैलबैला आणि मुळशीचा सूर्यास्त पाहात पुण्याला परतलो.



छायाचित्रे:
१. निखिल परांजपे
२. पुष्पेंद्र अरोरा

संदर्भः "चला ट्रेकिंगला" - पांडुरंग पाटणकर