Saturday, October 15, 2011

बझ्झ बंद होणार?

मी बझ्झ कधी पाहिले आणि कसा वापरायला लागलो ते आता मलाच आठवत नाही. Gmail सोबत बझ्झ आपसूक जोडले गेलेले असल्याने मेल सोबत बझ्झ चेक करणे हा गेली काही वर्षे नित्याचाच भाग बनला होता. बझ्झवर कवितेच्या, गाण्याच्या ओळी टाकणे, पुस्तकातून आवडलेल्या ओळी, कधी बातम्या, महत्वाच्या घडामोडींवर चर्चा, ट्रेकचे, सहलींचे वृत्तांत, आणि काहीच नाही तर मित्र-मैत्रीणींची खेचाखेची, त्यांचे आपल्या पोस्टवर आलेले आणि आपले त्यांच्या पोस्ट वरचे प्रतिसाद. केवढे तरी संचित साठलेले आहे. आज मागे जाऊन एखादी पोस्ट पाहिली की जुना मित्र खूप दिवसांनी भेटावा इतका आनंद होतो.

बझ्झवरचे माझे जवळपासचे सगळेच मित्र-मैत्रिणी पहिल्यांदा कधीच न भेटलेले होते. आपल्या सारखाच विचार करणारी, आपल्या सारखीच वागणारी, बोलणारी, लिहिणारी इतकी माणसे इथे आहेत याची जाणीव बझ्झने करुन दिली."सोशल नेटवर्किंग"चे बझ्झ हे माझे सगळ्यात आवडते साधन होते (आहे). फेसबुकचा अतिरेकी झगझगाट इथे नाही, ट्विटरसारखे शब्दांवर बंधन नाही. अकारण कोण काय करते आहे याच्या "अपटेस" नाहीत. आपण बरे आपला बझ्झ बरा असा साधेपणा आहे. आणि तो नवी नाती जोडायला पुरेसा आहे.

इथे अनेक जिवाभावाचे सोबती मिळाले. "नाघं"च्या ब्लॉगला चालना मिळाली. निस्वार्थ नाती जुळली. इतकी की बझ्झ बंद झाले तरी ती तुटणार नाहीत. पुढेही सगळे "टच" मधे राहतीलच, पण माहित नाही बझ्झची सर त्याला असेल की नाही?

बदल हा जीवनाचा एकमेव स्थायीभाव, आणि "वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा" हे जरी खरे असले तरी बझ्झशी जुळलेले नाते असे अनपेक्षितपणे भंग पावेल असा विचार मी कल्पनेतही कधी केला नव्हता, स्वप्नातही कधी केला नव्हता. "लिहू, लिहू", असे म्हणत ब-याच गोष्टी बझ्झवर लिहायच्या राहूनच गेल्या खरे.

असो, एखादी व्यक्ती "किती जगली?" याच्यापेक्षा "कशी जगली?" याला जास्त महत्त्व आहे.

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे?
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे?
हसूनी परी करी ते वर्षाव सौरभाचा...

असेच काहीसे.. मला तरी बझ्झचा हा प्रवास त्या फुलासारखाच वाटतो.

अकस्मात पुढे चाललेले आपण नक्कीच मागे वळून मधूनअधून बझ्झच्या आठवणी काढत राहू, आणि कदाचित आपल्या मुला-नातवंडांना सांगू "आमच्या काळी ना 'बझ्झ' होते...." :)

रोजच्या रहाटगाडग्यातून आता कधी लिहायला वेळ होईल माहित नाही, पण नाहीच झाले तरी निदान बझ्झवरची ही शेवटली पोस्ट बझ्झसाठी असेल.

:(

- स्वानंद

Saturday, July 30, 2011

काळा दिवस

त्या बातमीनंतर पुढची ५ मिनीटे माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. माझा नॉर्वेजिअन सहकारी मला 'गुगल मॅप'वर जागा दाखवत होता. ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर. ३-४ चौक सोडून पुढे. चित्र डोळ्याला दिसत होते पण ते मेंदूपर्यंत पोचत नव्हते.

'ऑस्लो'मध्ये 'बॉम्बस्फोट'?? इतक्या शांत शहरात 'बॉम्बस्फोट'? जिथे कधी साधा मोर्चा किंवा बंदही होत नाही तिथे?

१५ मिनिटांपूर्वीच आम्हाला एक हदरा जाणवला होता. पण त्याचे मूळ या बातमीत असेल अशी पुसटशी ही कल्पना मला नव्हती. बॉम्बचा हदरा इतका जोरदार होता की ऑफिसात सगळ्यांनाच तो स्पष्ट जाणवला होता. ही बातमी ऐकल्या नंतर पुढच्या ५ मिनिटात मनात काय काय विचार आले हे शब्दात सांगणे कठीण आहे.



हळूहळू nrk.no या नॉर्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर बातम्या येऊ लागल्या. थोड्यावेळाने ऑफिसच्या सुरक्षा अधिका-यांनी ध्वनीक्षेपकावरुन या बातम्या वाचायच्या/पहायच्या सुचना द्यायला सुरुवात केली. कामातले लक्ष तर केव्हाच उडाले. नव-नवीन बातम्या येऊ लागल्या. सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अजूनही बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. लोकांना ऑस्लोच्या मध्यवर्ती भागापासून दूर जाण्याच्या सुचना देण्यात येऊ लागल्या. पोलिसांची कुमक कमी पडू लागली. अनेक नागरिक आपण होऊन मदतीला धावले.



आम्ही घरी जावे की न जावे अश्या द्विधा मनःस्थितीत होतो. तासभर वाट बघून आम्ही घरी चालतच जाण्याचे ठरवले. पाचच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो, तेव्हा आमच्या सारखेच बाकी लोकही बाहेर पडलेले होते. बस, ट्राम सुरु होत्या, पण बहुधा सगळ्यांनीच आमच्या सारखाच चालत घर गाठायचा निर्णय घेतला होता. लोकांच्या चेह-यावर भीती स्पष्ट दिसत होती. झाले ते सारेच अनाकलनीय होते.

जागोजागी पोलिसांनी पट्ट्या लावून रस्ते बंद केले होते. पोलीसांच्या सुचना लोक शांतपणे ऐकत होते. आमचा घरी जायचा रस्ता ऑस्लोच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळून जातो. तिथेही लोकांची गर्दी होती. रस्त्यावर रुग्णवाहिका, त्यांना वाट दाखवणा-या पोलिसांच्या गाड्या धावत होत्या.

स्टेशनवरुन पुढे गेल्यावर मात्र ठिकठिकाणी काचा पडलेल्या दिसू लागल्या. अनेक इमारतींच्या, मॉलच्या काचा फुटल्या होत्या. एका वळणावरुन दुरुनच, जिच्या पायथ्याला स्फोट झाला ती इमारत दिसली. काळजात धस्स झालं. इमारतीच्या सगळ्या काचा छिन्नविछिन्न पडल्या होत्या.



क्षणभर थांबून माणसे ते दृश्य पहात होती. मीही थांबलो, पाहिले. न बोलताच घरी निघालो. दोन्ही बाजूचे फूटपाथ लोकांनी वाहात होते. मोठा आवाज करत पोलीस गाड्या, रुग्णवाहिका जात होत्या.

घरी पोचलो, इंटरेनेटवर बातम्या पाहू लागलो. भारतातल्या घरी आणि जवळच्यांना 'मी ठीक आहे', हे आधीच फोन करुन सांगितले होते. काही वेळाने 'उटाया'ची बातमी आली. बातम्या पाहात रात्री उशीरा झोपलो. एकूण घटनेत १०-१२ लोक दगावले असा अंदाज होता.

सकाळी उठल्या उठल्या nrk.no उघडले. ८६ ठार, माझे डोकेच चालेना, असे कसे झाले? बातमी वाचली हळूहळू समजले ऑस्लोतील बॉंम्बस्फोटापेक्षा 'उटाया' या ऑस्लोपासून ३०-४० किलोमीटर अंतरावरील बेटावर एका अज्ञात इसमाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात खूप जास्त माणसे मेली होती. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या होत्या, त्यातील काही जणांनी पोहून किनारा गाठला होता, तर अनेक बेपत्ता होते. काय करावे काहीच सुचेना. बातम्या पाहात शनिवारचा दिवस घरात बसून गेला.

रविवारी सकाळी बी. बी. सी वर पाहिले 'ऑस्लो कॅथेड्रल' मध्ये स्वतः नॉर्वेचे पंतप्रधान, राजा, राणी या घटनेतील मृतांसाठी प्रार्थना करत होते. त्यांना भावना एवढ्या अनावर होत होत्या की राजाराणीच काय पण पंतप्रधानांनाही त्यांचे अश्रू आवरले नाहीत. मग मात्र घरात बसवेना.



आम्ही बाहेर पडलो थेट 'कॅथेड्रल'मध्ये गेलो. अनेक लोक रांगेत उभे होते. थोड्या वेळात आत प्रवेश मिळाला. कॅथेड्रल मोठे सुरेख आहे. ३ बाजूनी दरवाजे आणि चौथ्या बाजूला क्रूस. दरवाजांच्यावर गॅलरी. तिथे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे लटकत होते. ऒळीने बेंचेस मांडलेले होते. कडेला बायबलच्या प्रती ठेवल्या होत्या. ऑस्लोच्या अगदी मध्यावर असूनही इथले वातावरण पवित्र आणि शांत होते.

पण दुर्दैव असे होते, की रविवारच्या प्रार्थनेला आलेल्या तिथल्या प्रत्येकाच्या चेह-यावर कसलासा करुण भाव होता. क्रूसाच्या समोर एक मोठी फॉइल पसरली होती. मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी लोक त्याच्यावर मेणबत्ती पेटवत होते. त्यात माणसे होती, बायका होत्या, चिमुरडी मुले होती, म्हातारी माणसे होती. अनेकांना अश्रू जड होत होते, काही धीर देत होते, सांत्वन करत होते.



मीही एक मेणबत्ती घेतली आणि घुढग्यावर खाली बसलो. आणि ती मेणबत्ती पेटवताना काय वाटले काय माहित. गळा दाटून आला. पहिल्यांदा मी नॉर्वेजिअन लोकांना रडताना पाहात होतो. कोण होती ही माणसे माझ्यासाठी? ना माझ्या मातीची, ना धर्माची, इतकंच काय पण कुणाशी साधी तोंडदेखली ओळखही नव्हती. पण गेल्या सहा-सात महिन्यांत नॉर्वेत राहताना, फिरताना, प्रवास करताना त्यांच्या चांगुलपणाची आणि निष्पाप मनाची ओळख फार जवळून झाली होती.

एरवी कधीही त्यांचे दर्शन हे हसतमुखच असायचे, सुखावणारे असायचे. वृत्ती ही नेहमीच दुस-याला मदत करणारी. आणि हा माझाच नाही तर माझ्या सा-या सहका-यांचा अनुभव होता. आणि आज एका घटनेत हा देश, ही माणसे दहशतवादाच्या क्रूर छायेखाली आली होती, सारा प्रकार दुःखी आणि अस्वस्थ करणारा होता.

कॅथेड्रलच्या बाहेर आलो, बाहेरच्या पटांगणात लोक फुलांचे गुच्छ ठेवत होते, फुलांचा मोठा गालिचा तयार होत होता. जणू काही या क्रूर घटनेत बळी गेलेल्यांना त्यांच्या देशबांधवांनी शेवटची निद्रा घेण्यासाठी केलेला तो सुंदर, कोमल बिछाना होता.




(छायाचित्रे nrk.no वरुन साभार.)

Wednesday, June 8, 2011

ट्रॉमसो

सकाळी साडे नऊच्या सुमारास आमचे विमान विमानतळावर उतरत होते. उजव्या बाजूला सूर्य क्षितीजावर केशरी, गुलाबी रंग उधळत होता. इथे उत्तर ध्रुवावर त्या बिचार्‍याला बहुतेक वेळ क्षितीजावरच रहावे लागते. त्या रक्तवर्णी छटांसोबत आकाशाची निळाई अंग घासत होती. खाली दूर दूरवर पांढरेपणा विखुरला होता, मनुष्यवस्तीचा कुठे मागमूसही नव्हता. थिजलेल्या नद्यांच्या कडेने जाणारे रस्तेही गोठलेले भासत होते. कधीतरी मधूनच घरांवरचे, रस्त्यांवरचे इवले इवले लुकलुकते दिवे दिसायचे आणि आपण पृथ्वीवरच आहोत याची जाणीव व्हायची.

विमानाने हवेत एक गिरकी घेतली, आणि हळू हळू ते खाली उतरू लागले. पहिल्यांदाच न गोठलेली गोष्ट दिसली- 'समुद्र'. विमान आणि समुद्रातील अंतर कमी कमी होऊ लागले. ५०० मीटर, ३०० मीटर, १५० मीटर, उजव्या बाजूला दोन बेटांना जोडणार्‍या पूलाची कमान स्पष्ट दिसू लागली. १०० मीटर, ५० मीटर, "आता विमान समुद्रातच उतरते की काय?" वरचा श्वास वर, खालचा खाली. हात नकळत पुढच्या सीटवर आधार शोधू लागले, असेच दोन क्षण गेले. मनात "भीमरूपी महारुद्रा.." सुरु होणार एवढ्यात जमीन दिसू लागली आणि पुढच्याच क्षणाला धावपट्टीला विमानाच्या चाकांचा झालेला स्पर्श जाणवला. आम्ही सुखरुप खाली उतरलो. त्या लँडिगने सगळ्या विमान प्रवासाची, सकाळी केलेल्या धावपळीची आणि ’ट्रॉमसो’ ला येण्याची किंमत वसूल केली.

’ट्रॉमसो’. नॉर्वेच्या उत्तरेचे एक नितांत सुंदर, शांत बेट. आर्टिक प्रदेशात येणारे हे बेट प्रसिद्ध आहे ते इथून दिसणार्या ’पोलार लाईटस’साठी. सुर्यावर होणार्या वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात येणा-या लहरी पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या रेणूंना भिडल्या की आकाशात कधी लाल, कधी हिरव्या, तर कधी जांभळ्या रंगांची उधळण होते.

ध्रुव प्रदेशाजवळ हे दृश्य दिसण्याची शक्यता खूप जास्त असते. ’ट्रॉमसो’ यासाठी उत्तम ठिकाण आहे. पण निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी तुमचे नशीबही तितकेच जोरदार हवे. हे लाईट कधी दिसतील यावर फार आधी भाष्य करता येत नाही. आणि जेव्हा हे पहायचे तेव्हा हवामानही स्वच्छ असायला हवे. आकाश निरभ्र हवे.

आम्हाला हे लाईट दिसावेत ही प्रार्थना करत आम्ही ’ट्रॉमसो’च्या विमानतळावर ऊभे होतो. नॉर्वेतल्या इतर शहरांप्रमाणेच ट्रॉमसोच्या मध्यवर्ती भागाचे नाव 'सेंट्रम' आहे. तिथे बस पकडून पोचलो, तिथे थोडी चौकशी केल्यावर आम्हाला 'टूरिस्ट ऑफिस' मिळाले. तेथील कर्मचार्य़ांनी शहराची इस्तंभूत माहिती दिली. एक नकाशाही दिला. नकाशा पाहून हे लक्षात आले की शहर खूप लहान आहे. आणि पहायच्या गोष्टी जवळ जवळ आहेत.

आम्ही आधीच रहाण्याची सोय केली होती. नकाशा पाहात पाहात आम्ही रहायच्या ठिकाणी पोचलो. 'सिसिली' नावाच्या मुलीने आमचे तिथे स्वागत केले. आम्हाला जागा दाखवली. रहायची सोय उत्तम होती. सुसज्ज स्वयंपाकघर, आवश्यक ते सर्व फर्निचर, मोठा एल. सी. डी. टीव्ही, इंटरनेट. पहिल्या मजल्यावर झोपायची सोय होती. सिसिलीने सारे नीट समजावून सांगितले. अगदी टीव्ही कसा सुरु करायचा यापासून कचरा कुठे टाकायचा इथेपर्यंत. आमचा निरोप घेऊन आणि आमच्या ताब्यात घर देऊन ती गेली. डायनिंग टेबलवरून असे दृश्य दिसत होते.



जेवण करून आम्ही "पोलारिया" हे समुद्री जिवांचे संग्रहालय पहायला गेलो. इथे जिवंत आणि मेलेले (संग्रहित केलेले) दोन्ही प्रकारचे प्राणी आहेत. एक छोटे चित्रपट्गृहही आहे. इथे १५ मिनीटांचा पॅनोरॅमिक सिनेमा पाहिला. त्यात एका फ्रेंच माणसाची अंटार्टिका मधील हेलिकॉप्टरची सफर दाखवली होती. चित्रपटांमध्ये दाखवलेल्या काही काही जागा श्वास रोखून धरायला लावणार्‍या होत्या. सिनेमा संपल्यावर आम्ही संग्राहलयात गेलो. इथे ध्रुव प्रदेशात आढळणारे प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दाखवलेले होते. ध्वनी-प्रकाशाचा वापर करून तंतोतंत वातावरण निर्मिती केली होती.



नंतर एक मोठा कृत्रिम तलाव लागला. यामधे खूप विचित्र प्रकारचे मासे सोडलेले होते. काही कचकड्यासारखे कृत्रिम वाटत होते, पण थोडी हालचाल झाली की कळायचे हे खरे आहेत, जिवंत आहेत. मग लागला सील माश्यांचा तलाव, 'सील शो' हे इथले मुख्य आकर्षण. या तलावात सात वर्षाची एक प्रौढ सील माश्यांची मिशाळ जोडी आणि दीड महिन्याची दोन पिल्ले होती. भिंगरी लावल्या सारखे ते चार जीव एकसारखे इकडून तिकडे फिरत होते. मधूनच डोके पाण्यावर काढून मिश्या फेंदारत होते.



आम्ही तलावाजवळ पोचलो तेव्हा त्यांना खायला द्यायची वेळ झाली होती. जेव्हा या सील माश्यांना खायला देतात तेव्हा ते तरतरीत रहावे म्हणून त्यांना प्रशिक्षणही देतात. काही करामती शिकवतात. सूचना देताच पाण्याबाहेर येणे, पाण्यात गिरक्या घेणे, पाण्यात टाकलेली/बुडलेली वस्तू आणून देणे असे अनेक खेळांचे प्रकार पहायला मिळाले. पण बदली वाजवून जेव्हा ट्रेनरने आता अन्न संपले हे जेव्हा घोषित केले तेव्हा मात्र या करामती थांबल्या आणि सील पहिल्यासारखे आपल्या क्रीडेत गुंग झाले. मग परत ट्रेनरनी कितीही वेळा बोलावले तरीही ते आले नाहीत. माणसासाखेच ते फक्त मोबदल्यासाठी काम करतात.



मग मोठमोठे खेकडे, स्टार फिश, सन फिश, प्रवाळ पाहिले. इथे मुलांना खेळण्यासाठी बरीच खेळणी होती. ६-७ लहान मुलींचा घोळका पूर्ण अॅक्वेरिअमभर फिरत होता. त्या चित्र विचित्र प्राणी पाहून चकित होत होत्या, एका टाकीकडून दुसरीकडे धावत होत्या. पण त्यांच्या या खेळाला त्यांचे पालक किंवा संग्रहालयाचे अधिकारी कुणीही मज्जाव केला नाही. उलट त्यांच्या प्रश्नाची खूप संयमाने उत्तरे देण्याचा प्रयत्न दिसला. बोटीच्या डेकचा आभास दिलेले एक छोटे रेस्टॉरंट या संग्रहालयात होते.





इथून जवळच एक आर्ट गॅलरी होती. पण दुरुस्तीसाठी ती बंद ठेवण्यात आली होती. आम्ही चालत पुन्हा 'सेंट्रम'कडे आलो. इथून आम्ही पोलर लाईटस पाहण्यासाठी एका गाईड कंपनी सोबत शहराच्या बाहेर गेलो. ध्रुवीय प्रदेशात सामी नावाचे आदिवासी लोक राहतात. त्यांचे तंत्र वापरून केलेल्या सामी प्रकारच्या तंबूत आमची थांबायची सोय केली होती. आम्हाला तिथे गरम कपडे, बूट देण्यात आले. आमच्यासाठी चहा आणि थोडा हलका आहारही ठेवला होता.

सामी तंबूच्या मध्यभागी एका जाळीवर आग लावली होती. आगीची राख जाळीखाली पडत होती आणि धूर छताच्या मधल्या भागातून बाहेर पडत होता. आगीच्या भोवतीने आणि तंबूच्या आतील बाजूने सगळीकडे रेनडिअरची उबदार कातडी अंथरली होती. त्यामुळे बाहेरचे उणे तापमान तंबूमध्ये अजिबात जाणवत नव्हते.



आमच्या सोबतची बरीच माणसे डॉग स्लेजिंग करायला गेली. (कुत्र्यांच्या मदतीने बर्फावर गाडी ओढणे). तंबू बाहेर आमची आकाश बघत बसण्याची सोय केली होती. आमच्या सोबत एक ब्रिटिश व एक जपानी जोडपे होते, काका-काकू प्रकारातले. खास फिरायला आले होते. त्यांच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या.

चंद्राभोवती एक वलय पडले होते. अष्टमीच्या जवळची तिथी असावी. थोडेसे तारे लुकलुकत होते. बराच वेळ बसूनही लाईटस दिसायचे काही चिन्ह दिसेना. म्हणून आम्ही आमच्या नॉर्वेजिअन गाईडच्या आग्रहाखातर कुत्र्याची पिल्ले पहायला गेलो. तंबू जवळच एक छोटे घर बांधलेले होते. त्याच्या मागे १००-१५० कुत्र्यांची खुराडी होती. बरीच कुत्री आधीच गाडी ओढण्यासाठी बाहेर गेली होती. परिणमी, खुराड्यांमध्ये काही थोडी कुत्री उरली होती. घराच्या बाजूला एक मोठा पिंजरा उभारला होता. त्यात सगळी कुत्र्यांची पिल्ले ठेवली होती. इतक्या थंडीतही ती पिंजर्‍यात आनंदाने बागडत होती. त्यांच्याशी खेळण्याची इच्छा थंडीमुळे अवरती घेऊन आम्ही परत लाईट पाहण्यासाठी येऊन बसलो.



आमचे नशीब मात्र रुसलेले होते. गेला अठवडाभर निरभ्र राहिलेल्या आकाशात ढग वाढू लागले होते. पोलर लाईट दिसण्याची आशा अंधुक होऊ लागली. रात्री उशीरा चरफडत आम्ही घरी परतलो.

सकाळी उठलो तेव्हाही निराशा होतीच, ज्यासाठी आलो होतो ते काम काही झाले नव्हते. पण दिवाणखान्यातून दिसणारा बर्फाळ डोंगर पाहून निराशा कुठल्या कुठे पळून गेली. त्याचा रुपाने सगळा ध्रुवीय प्रदेशच साद घालत होता. आम्ही बाहेर पडलो.

ट्रॉमसो आर्टिक प्रदेशात येत असल्याने हिवाळ्यात इथे खूपच लौकर अंधार पडतो. आम्ही होतो त्या दोनही दिवशी सकाळी दहाला उजाडले आणि दुपारी दोन-अडीच वाजता मिट्ट काळोख पडला.

आम्ही 'माऊंट स्टॉर्स्टेविअन'कडे निघालो. ही ट्रॉमसोच्या जवळची एक टेकडी आहे. हीच्या डोक्यावर जायला छान केबलकार आहे. आम्ही केबलकारने जसे वर वर जाऊ लागलो, तसतसे ट्रॉमसो उलगडू लागले. हातातल्या नकाशासारखे भासू लागले.





इथे उंचावर खूप वारा होता. इतका की आपण उडून जाऊ असे वाटत होते. वा-यामुळे भयानक थंडी वाजत होती. पण समोरचे दृश्य ते सारे विसरायला लावत होते. आणि ते चित्र इवल्या कॅमे-यात बसत नव्हते.





खूप वेळ आम्ही टेकडीवरुन 'ट्रॉमसो' न्याहाळत होतो. आजूबाजूच्या उंच उंच डोंगरांमध्ये वसलेले टुमदार बेट. त्याच्यावर इमारतींची दाटी. त्या बेटाला दिसणा-या पुलांच्या कमानी. सारे चित्रासारखे. मधेच दर्यातून जाणारी एखादी नाव "अरे हे तर खरे आहे!" याची जाणीव करुन द्यायची.

इथे उंचावर थंडीत मस्त कॉफी प्यायला मिळाली तर किती मजा येईल. आम्ही असा विचार करत होतो तोच गॅलरीच्या पलिकडे एक सुसज्ज रेस्टॉरंट दिसले. ट्रॉमसो पहायच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेले नव्हते. मग खिडकीची जागा पकडून हॉट चॉकलेटचे घुटके घेऊ लागलो. आकाशाचा कॅन्व्हास नवी नवी रुपे दाखवत होता.





बराच वेळाने आम्ही टेकडी उतरलो. अंधार पडायला लागला होता. दिवेलागण सुरु झाली होती.



पण घड्याळात दुपारेचे दोनच वाजले होते. निसर्ग अंधारात बुडला असला तरी माणसे जागी होती. आम्ही 'पोलार म्युझियम' मध्ये शिरलो. हे संग्रहालय म्हणजे अनादि काळापासूनचा ध्रुवीय प्रदेशाचा इतिहास. इथली माणसे, त्यांचे राहणीमान, त्यांच्या क्रीडा सारे काही वेगवेगळ्या दालनांमधून मांडले होते. पुतळे तर अगदी खरे भासत होते. (नॉर्वेतील माणसेसुद्धा पुतळ्यासारखी भासतात, रेखीव, बांधेसूत)







ध्रुवीय प्रदेशातील प्राणी होते, त्यात सील,वॉलरस, ध्रुवीय अस्वल, कोल्हे, कुत्री असे नाना प्रकार होते. महत्वाचे म्हणजे सगळे प्राणी खरे होते.





त्यांची कातडी खरी होती. त्यावरुन हात फिरवता येत होता. त्यातली ध्रुवीय कोल्हयाची कातडी म्हणजे मी अत्तापर्यंत अनुभवलेला सगळ्यात माऊ स्पर्श होता. इतक्या सुंदर कातडीची कुणालाही भुरळ पडेल.





परिणामी इथे प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. आणि ती दाखवणारे देखावेही तिथे होते.





फक्त 'सील'चीच शंभराच्यावर सोलून ठेवलेली कातडी होती. कोल्हे, कुत्री, अस्वले वेगळेच. ते पाहून थोडे वाईट वाटले.



संग्रहालयाच्या बाहेर पडलो तेव्हा पूर्ण अंधार पडला होता. पोटात कावळे ओरडत होते. रहायच्या जागी परत जाता जाता एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो, सुदैवाने तिथे व्हेज पिझ्झा मिळाला. दुस-या दिवशी परताना राहून राहून वाटत होते, अजून रहावे इथे. विमानाच्या खिडकीतून खाली पाहताना ट्रॉमसो एखाद्या शांत, कोवळ्या, गाढ झोपलेल्या बाळासारखे दिसत होते.

Sunday, June 5, 2011

नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

सकाळी आठला ट्रेनने बर्गन सोडले. "बर्गन ट्रेन"चा प्रवास म्हणजे डोळे उघडे ठेवून पाहिलेले स्वप्न. ट्रेन हळुहळु डोंगर चढत होती. एका बजूला उंच पहाड, आणि दुस-या बाजूने जमीनीच्या चिंचोळ्या भागातून आत घुसलेले समुद्राचे पाणी. त्याच्या पलिकडे पुन्हा उंच उंच पहाड, आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबात आपले सौंदर्य न्याहाळणारी पांढुरकी हिमशिखरे.

(बर्गन ट्रेन मधून)


या मार्गावरुन जाताना अम्ही निम्मा वेळ बोगद्यातच होतो. एकदम बोगदा संपायचा, समोरचा नजारा डोळ्यात साठवेपर्यंत अम्ही दुस-या बोगद्यात गेलेलो असायचो. यात फोटो काढायला कुठली सवड? मी थोडा वेळ प्रयत्न केला पण धड फोटोही येत नव्हता आनि फोटोच्या धांदलीत काही पहायलाही मिळत नव्हते. शेवती मी कंटाळून कॅमेरा मित्राकडे देऊन टकला, आणि खिडकीतून बाहेरचे सौंदर्य पाहू लगलो.

मनात सहज विचार आला, कोकणातून घाटावर यायला जेव्हा रेल्वे निघेल तेव्हा ती अशीच असेल. एका बाजुला डोंगर दुसरीकडे दरी, पावसाळ्यात डोंगर कड्यांवरुन फेसाळणारे धबधबे. मी नॉर्वेमध्ये नाहीच, सह्याद्री मध्येच अहे असे वाटू लागले.

(एका कड्यावर..)


बर्गन ट्रेन अम्ही वॉस या गावी सोडली. तिथून बसने गुडवँगन या गावी निघालो. प्रवास ३०-४० मिनीटांचा असेल. दोन्ही बाजूना छान हिरवे गवत उगवले होते. बर्फाचे सरोवरांवरील राज्य संपू लागले होते. कोठे कोठे पेरणी सुरु होती. शेताच्या कडेने एकेकटी घरे दिसत होती. या छोट्या प्रवासातही बोगदे होते, धबधबे तर दोन्ही बाजूनी झेपावत होते.

(सरोवर)


आम्ही गुडवॅंगनला पोचलो. एकदम ’बेष्ट’ जागा आहे ही. तिथे मोजकीच घरे होती. काही हॉटेल, दुकाने आणि बोटींसाठी छोटा धक्का. चारही बाजू डोंगरांनी वेढलेल्या, डोंगरही साधेसुधे नाही तर १००० मीटर उंच. इतके की शिखरे बर्फाने झाकलेली. एका बाजूने ’फियॉर्ड’चे पाणी त्याला मिळणारी एक नदी. ती ओलांडण्यासाठी लहान लहान पूल.

(गुडवॅंगन)




"इतक्या चिंचोळ्या पाण्यात बोटी चालत असतील?" आम्ही असा विचार करत होतो तोच समोरच्या बेचक्यातून एक बोट बंदराकडे येताना दिसली.

(बोट)


आम्ही बोटीवर चढलो. सगळ्यात वरच्या डेकवर बसायला भरपूर खुर्च्या होत्या. मंद वारा सुटला होता. आणि जशी बोट सुरु झाली तसा तो झोंबू लागला. बोटीबरोबर सीगल उडत होते.

(सीगल)


आम्ही पुढचे दोन तास निर्सगाचा अद्भुत अविष्कार बघणार होतो. "फ्लाम"ला जोडणारी ही फियॉर्ड अतिशय सुंदर आहे. कुठे कुठे ही फियॉर्ड फक्त २५० मीटर रुंद आहे. हिच्या दोन्ही बाजूनी उंच पर्वत. इतके की काही ठिकाणी यांची उंची १८०० मीटर एवढी आहे. पाण्याची खोलीही काही ठिकाणी १००० मीटरपेक्षा जास्त आहे. वाटेत छोटी छोटी गावे आहेत. बरीचशी बाहेरील जगाला फक्त जलमार्गाने जोडलेली आहेत.

(फियॉर्डमधील एक गाव)


यातल्याच एका गावी आमची बोट थांबली दोन मोठी माणसे आणि ३ लहान मुले बोटीवर चढली. त्यातल्या एक माणूस डेकवर आला आणि जणू आमची आधीपासूनच ओळख आहे अशा थाटात आमच्याशी बोलू लागला. तो जर्मन होता. भारताबद्दल त्याला माहिती होती. तो मुलांसोबत खास सुट्टीसाठी या शांत गावी रहायला आला होता. पण त्याच्या मुलांकडे पाहून ती जागा शांत राहिली असेल असे मुळीच वाटले नाही. कारट्यांनी नुसता उच्छाद मांडला होता. डेकवरच्या सगळ्या खुर्च्या एकत्र करुन त्याची त्यांनी चळत रचली होती. त्यांच्यातला सगळ्यात शांत मुलगा त्याची बाहुली घेऊन त्या चळतीच्या सगळ्यात उंच टोकावर बसला होता. आणि उरलेली दोघे वर खाली करत होते. दंगा तर इतका की शेवटी बोटीचा कॅप्टन बाहेर आला. मग आपण जसे दंगा करणा-या मुलांना भीती दाखवायला सांगू तसे त्याने त्यांना लटके दरडावले, "मी पोलीस आहे, तुम्ही दंगा थांबवला नाहीत तर कोंडून ठेवेन." त्यांची भाषा कळत नसूनही त्यांचा संवाद मात्र थेट आम्हाला कळला. माणसे वरुन वेगळी दिसली तरी आतून मात्र सारखीच असतात हे पाहून गंमत वाटली.

समोरची चित्रे क्षणाक्षणाला बदलत होती. वर्णनापलिकडे सुंदर होत होती.

(फ्लाम फियॉर्ड)






दुपारी २ वाजता आम्ही ’फ्लाम’ला पोचलो जमर्न काका आणि चिल्ल्यापिल्ल्यांना बाय बाय केले. ’फ्लाम’ एक खूप छोटे गाव आहे. खेडेच. तिथे रेल्वेचा प्लॅटफॉर्म, बोटीचा धक्का आणि मुख्य रस्ता सारे एकच आहे. पर्वतांनी वेढलेल्या या गावाला निसर्गाचे अनमोल वरदान मिळाले आहे. आमच्याकडे ३ तास वेळ होता. आम्ही गावाभोवतीने फेरफटका मारायचे ठरवले. या गावाभोवतीच्या डोंगरांधून फिरण्यासाठी छान रस्ते केलेले आहेत. त्याचे नकाशेही मिळतात. ते घेऊन आम्ही वाट पकडली. मखमाली हिरवळ, छोटी छोटी घरे, दूरवरचे पांढुरके डोंगर, झुळझुळती नदी, तिला येऊन मिळणारे ओढे.

(फ्लाम)






गावात मोजकीच घरे होती. थोडकी शेती आणि जोडीला पशुपालन असा एकंदरीत गावक-यांचा व्यवसाय दिसत होता. आम्हाला बरेच प्राणी पहायला मिळाले. मेंढ्या, गाई, त्यांची राखण करणारी कुत्री. शेवटी आम्ही फ्लामच्या जुन्या चर्चपाशी जाऊन पोचलो. हे चर्च बरेच जुने आहे. १३-१४व्या शतकातील. त्याचे दार लावलेले होते. आम्ही दार उघडून आत गेलो. जेमतेम २०-२५ माणसे बसू शकतील एवढी जागा, मध्यभागी येशूची प्रतिमा, भिंतीवर चित्रविचित्र आकृत्या होत्या. आतले वातावरण एकदम शांत होते. थोडावेळ बसून आम्ही तिथून परतलो.

(फ्लामचे चर्च)


(गाई)


आता "फ्लाम ट्रेन"ने फ्लाम ते मिरदाल हा प्रवास करायचा होता. हा लोहमार्ग जगातील सगळ्यात तीव्र चढाच्या लोहमार्गापैकी एक आहे. फ्लाम समुद्रसपाटीपासून २ मीटर उंचीवर तर मिरदाल ८६८ मीटर उंचीवर. दोन्ही गावे जोडणारा हा मार्ग केवळ १९ किलोमीटर लांब आहे. हा बांधायला नॉर्वेजियन लोकांना सुमारे ४० वर्षे लागली. या मार्गावरील सर्व बोगदे हाताने खणलेले आहेत. एका बोगद्यात तर ही ट्रेन १८० अंशांमध्ये वळते. वाटेत एक उंच धबधबा लागतो. तो पहायला तिथे ट्रेन काही वेळ थांबते.

(मिरदालचा रस्ता)


(शोफोसन धबधबा)


जसजशी ट्रेन उंचावर जाऊ लागली तशी हिरवळ गेली, पुन्हा हिम दिसू लागले. मिरदालला उतरलो तेव्हा तर खूपच थंडी जाणवू लागली. मिरदालला परत बर्गन वरुन ऑस्लोला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेन वेगाने धावत होती. बाहेरचे हिम ऑस्लोच्या हिवाळ्याची आठवण करुन देत होते. आम्ही गेल्या ४ दिवसांची उजळणी करत होतो. पुन्हा पुन्हा. 'यापेक्षा अजून काही सुंदर असते जगामध्ये?' मी मलाच विचारत होतो. 'नाही' मनाने उत्तर दिले. "मग परत कधी?" बाहेरुन त्याने आवाज दिला.

(समाप्त)

Sunday, May 29, 2011

नॉर्वे भ्रमंती - ४ (बर्गन)

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

’बर्गन’- नॉर्वेमधील ऑस्लो नंतरचे सर्वात मोठे शहर. ११-१२व्या शतकात या शहराला उत्तर युरोपाच्या राजधानीचा दर्जा मिळाला होता. सात टेकड्यांच्या कुशीत वसलेले हे बंदर त्याच्या भौगोलिक रचनेमुळे मानवी वस्तीसाठी आदर्श ठिकाण आहे. टेकड्यांवरुन सुर्यकिरण परावर्तित होत असल्यामुळे हा भाग कडाक्याच्या हिवाळ्यातही उबदार राहतो. शहराच्या आजूबाजूला जेव्हा हिम साठलेले असते तेव्हा शहरात मात्र हिरवळ दिसू शकते. पण थंडीची कमतरता इथे पावसाने भरुन काढलेली आहे. इथे खूप पाऊस पडतो. इतका की. २००७ साली इथे सलग ८५ दिवस पाऊस पडत होता. आणि त्यामुळेच की काय इथली आजूबाजूची झाडी सदाहरित जंगलांची आठवण करुन देते.

आम्ही बर्गनला पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजून गेले होते. पुढचा पूर्ण दिवस हातात होता. दिवस उन्हाळ्याचे असल्याने सूर्यही निदान साडे नऊ पर्यंत मावळणार नव्हता. बर्गन पहायला हा वेळ पुरेसा नसला तरी या शहराची चव घ्यायला मात्र नक्कीच जमणार होते.

बर्गन गल्ली-बोळांचे शहर आहे. टेकड्यांमध्ये वसलेले असल्याने प्रचंड चढउतार. तसे म्हणा, नॉर्वेला सपाट प्रदेश मुळी मिळालाच कुठे आहे? आपल्याकडे सह्याद्री आणि हिमालय यांच्यातील भूभाग समजा गायब झाला तर जी अवस्था होईल तीच नॉर्वेची अवस्था आहे. गल्लीबोळांतून आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. जुन्या धाटणीच्या युरोपियन इमारतींच्या जुडग्यात आमचे हॉटेल होते. समोर छान बाग आणि बागेत इवलेसे तळे.

(आमचे हॉटेल)


हॉटेलचा मालक, ’लासा’ त्याचे नाव, खूप मृदु, आतीथ्यशील होता. एका नागमोडी जिन्यावरुन आम्ही वर गेलो. त्याने आम्हाला आमची खोली दाखवली. बाकी गोष्टी समजाऊन सांगितल्या. आम्ही सामान टाकले आणि बाहेर पडलो. सोबत शहराचा नकाशा होताच. तो पाहात आम्ही पोचलो ’फ्लोइएन’ डोंगरावर जाणा-या ’फ्लोइबानन फ्युनिक्युलर’च्या बोगद्यात. ही एक पिटुकली ट्रेन आहे. बर्गनच्या सर्वात उंच टेकडीवर म्हणजेच ’फ्लोइएन’ डोंगरावर ही ट्रेन ५ मिनिटात नेते. या ट्रेन लाईनची रचना अभ्यासण्यासारखी आहे. 'पुली'चा उपयोग करुन एकाच वेळी २ ट्रेन चलतात. एक वर जाणारी आणि दुसरी खाली येणारी. परिणामी या ट्रेन चालवण्यासाठी खूप कमी उर्जा लागते.

(’फ्लोइबानन फ्युनिक्युलर’)




टेकडीवरुन बर्गनचा नजारा अफलातून दिसतो. बर्गनचा मध्यभाग बराचसा आटोपशीर आहे. त्यामुळेच हे शहर नॉर्वेच्या इतर कोणत्याही शहरापेक्षा जास्त जिवंत वाटते. दूरवर पसरलेल्या इमारती, बागेतली थुईथुई कारंजी, वाहणारे रस्ते, आणि बंदरात दाटीवाटीने उभ्या असणा-या बोटी.

(बर्गन)






टेकडीवर गर्द झाडी आहे. उंच उंच झाडे, जागोजागी वाहणारे झरे, कॅंपिंग करायला आदर्श जागा. इथे एक तंबूही लावलेला दिसला. टेकडीवर फिरायला घेऊन जाणा-या ब-याच वाटा दिसत होत्या. पण वेळ कमी होता. आम्ही टेकडी उतरलो. फिशमार्केट मधून चालत चालत बर्गच्या किल्ल्यात गेलो. बंदराच्या तटाला लागूनच हा किल्ला आहे. २-३ इमारती चांगल्या शाबूत दिसल्या. बाकीचे भग्न अवशेष. दुस-या महायुद्धात नाझी सैनिकांनी इथेच त्यांचा तळ ठोकला होता. आता पूर्ण किल्ल्याचे बागेत रुपांतर केलेले आहे

(फिशमार्केट - ब्रिग्गेन)


(किल्ला)


आता अंधार पडायला लागला होता. आम्ही परत निघालो. जाताना बर्गनच्या मुख्य चौकात आम्हाला मुलामुलींचा एक ग्रुप चक्क गल्ली क्रिकेट खेळताना दिसला. आम्हीही मग थोडी ’फिल्डिंग’ केली.



वाटेवरच एक उंच कॅथेड्रल होते. आम्ही तिथे थोडे रेंगाळलो. तिथे आम्हाला दोन माणसे एका विचित्र उपकरणाशी खेळताना दिसली. जवळ जाऊन पाहिले तर ते एकदम ओळखीचे निघाले. बघा, तुम्हाला ओळख पटते का?

(ओळख पटते का?)


आमची जिज्ञासा पाहून त्यातील एकाने (थॉमस त्याचे नाव) ते हेलिकॉप्टर व्यवस्थित दाखवले. ते कसे काम करते, हे समजाऊन सांगितले. थॉमसने स्वतः त्याचे सगळे भाग विकत घेऊन जोडले होते. त्याच्या मध्यभागी त्याने एक कॅमेरा बसवला होता. त्याचे कंट्रोल सगळे जमिनीवरुन देता येतील असे दुसरे यंत्र त्याच्या हातात होते. थॉमसने हेलिकॉप्टर उडवले. आणि तो फोटो काढू लागला. बराच वेळ त्याचा हा कार्यक्रम सुरु होता.

(जोहान्सन चर्च थॉमसच्या कॅमे-यातून)


त्याने काढलेली इतर छायाचित्रे या दुव्यावर पाहता येतील.

त्याचा निरोप घेऊन आम्ही निघालो. हॉटेलवर आलो. रोज दमून गाढ झोपायची आता सवय झाली होती.

(क्रमशः)

नॉर्वे भ्रमंती - ५ (फ्लाम)