Saturday, October 15, 2011

बझ्झ बंद होणार?

मी बझ्झ कधी पाहिले आणि कसा वापरायला लागलो ते आता मलाच आठवत नाही. Gmail सोबत बझ्झ आपसूक जोडले गेलेले असल्याने मेल सोबत बझ्झ चेक करणे हा गेली काही वर्षे नित्याचाच भाग बनला होता. बझ्झवर कवितेच्या, गाण्याच्या ओळी टाकणे, पुस्तकातून आवडलेल्या ओळी, कधी बातम्या, महत्वाच्या घडामोडींवर चर्चा, ट्रेकचे, सहलींचे वृत्तांत, आणि काहीच नाही तर मित्र-मैत्रीणींची खेचाखेची, त्यांचे आपल्या पोस्टवर आलेले आणि आपले त्यांच्या पोस्ट वरचे प्रतिसाद. केवढे तरी संचित साठलेले आहे. आज मागे जाऊन एखादी पोस्ट पाहिली की जुना मित्र खूप दिवसांनी भेटावा इतका आनंद होतो.

बझ्झवरचे माझे जवळपासचे सगळेच मित्र-मैत्रिणी पहिल्यांदा कधीच न भेटलेले होते. आपल्या सारखाच विचार करणारी, आपल्या सारखीच वागणारी, बोलणारी, लिहिणारी इतकी माणसे इथे आहेत याची जाणीव बझ्झने करुन दिली."सोशल नेटवर्किंग"चे बझ्झ हे माझे सगळ्यात आवडते साधन होते (आहे). फेसबुकचा अतिरेकी झगझगाट इथे नाही, ट्विटरसारखे शब्दांवर बंधन नाही. अकारण कोण काय करते आहे याच्या "अपटेस" नाहीत. आपण बरे आपला बझ्झ बरा असा साधेपणा आहे. आणि तो नवी नाती जोडायला पुरेसा आहे.

इथे अनेक जिवाभावाचे सोबती मिळाले. "नाघं"च्या ब्लॉगला चालना मिळाली. निस्वार्थ नाती जुळली. इतकी की बझ्झ बंद झाले तरी ती तुटणार नाहीत. पुढेही सगळे "टच" मधे राहतीलच, पण माहित नाही बझ्झची सर त्याला असेल की नाही?

बदल हा जीवनाचा एकमेव स्थायीभाव, आणि "वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा" हे जरी खरे असले तरी बझ्झशी जुळलेले नाते असे अनपेक्षितपणे भंग पावेल असा विचार मी कल्पनेतही कधी केला नव्हता, स्वप्नातही कधी केला नव्हता. "लिहू, लिहू", असे म्हणत ब-याच गोष्टी बझ्झवर लिहायच्या राहूनच गेल्या खरे.

असो, एखादी व्यक्ती "किती जगली?" याच्यापेक्षा "कशी जगली?" याला जास्त महत्त्व आहे.

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे?
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे?
हसूनी परी करी ते वर्षाव सौरभाचा...

असेच काहीसे.. मला तरी बझ्झचा हा प्रवास त्या फुलासारखाच वाटतो.

अकस्मात पुढे चाललेले आपण नक्कीच मागे वळून मधूनअधून बझ्झच्या आठवणी काढत राहू, आणि कदाचित आपल्या मुला-नातवंडांना सांगू "आमच्या काळी ना 'बझ्झ' होते...." :)

रोजच्या रहाटगाडग्यातून आता कधी लिहायला वेळ होईल माहित नाही, पण नाहीच झाले तरी निदान बझ्झवरची ही शेवटली पोस्ट बझ्झसाठी असेल.

:(

- स्वानंद

1 comment:

  1. buzz बाबा कुठे निघाले सर्वांना सोडून? इतके सारे त्यांचे चाहते ....स्वानंद पटापट जे काही buzz वर टाकायचे होते टाक.... आम्हा सर्व वाचकांना तुझ्या नवीन रचना तुझे लेखन वाचता येईल.....पण buzz चे नसणे जाणवणार आहे हे मात्र नक्की.....

    ReplyDelete