Saturday, July 30, 2011

काळा दिवस

त्या बातमीनंतर पुढची ५ मिनीटे माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. माझा नॉर्वेजिअन सहकारी मला 'गुगल मॅप'वर जागा दाखवत होता. ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर. ३-४ चौक सोडून पुढे. चित्र डोळ्याला दिसत होते पण ते मेंदूपर्यंत पोचत नव्हते.

'ऑस्लो'मध्ये 'बॉम्बस्फोट'?? इतक्या शांत शहरात 'बॉम्बस्फोट'? जिथे कधी साधा मोर्चा किंवा बंदही होत नाही तिथे?

१५ मिनिटांपूर्वीच आम्हाला एक हदरा जाणवला होता. पण त्याचे मूळ या बातमीत असेल अशी पुसटशी ही कल्पना मला नव्हती. बॉम्बचा हदरा इतका जोरदार होता की ऑफिसात सगळ्यांनाच तो स्पष्ट जाणवला होता. ही बातमी ऐकल्या नंतर पुढच्या ५ मिनिटात मनात काय काय विचार आले हे शब्दात सांगणे कठीण आहे.



हळूहळू nrk.no या नॉर्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर बातम्या येऊ लागल्या. थोड्यावेळाने ऑफिसच्या सुरक्षा अधिका-यांनी ध्वनीक्षेपकावरुन या बातम्या वाचायच्या/पहायच्या सुचना द्यायला सुरुवात केली. कामातले लक्ष तर केव्हाच उडाले. नव-नवीन बातम्या येऊ लागल्या. सगळीकडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अजूनही बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. लोकांना ऑस्लोच्या मध्यवर्ती भागापासून दूर जाण्याच्या सुचना देण्यात येऊ लागल्या. पोलिसांची कुमक कमी पडू लागली. अनेक नागरिक आपण होऊन मदतीला धावले.



आम्ही घरी जावे की न जावे अश्या द्विधा मनःस्थितीत होतो. तासभर वाट बघून आम्ही घरी चालतच जाण्याचे ठरवले. पाचच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो, तेव्हा आमच्या सारखेच बाकी लोकही बाहेर पडलेले होते. बस, ट्राम सुरु होत्या, पण बहुधा सगळ्यांनीच आमच्या सारखाच चालत घर गाठायचा निर्णय घेतला होता. लोकांच्या चेह-यावर भीती स्पष्ट दिसत होती. झाले ते सारेच अनाकलनीय होते.

जागोजागी पोलिसांनी पट्ट्या लावून रस्ते बंद केले होते. पोलीसांच्या सुचना लोक शांतपणे ऐकत होते. आमचा घरी जायचा रस्ता ऑस्लोच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळून जातो. तिथेही लोकांची गर्दी होती. रस्त्यावर रुग्णवाहिका, त्यांना वाट दाखवणा-या पोलिसांच्या गाड्या धावत होत्या.

स्टेशनवरुन पुढे गेल्यावर मात्र ठिकठिकाणी काचा पडलेल्या दिसू लागल्या. अनेक इमारतींच्या, मॉलच्या काचा फुटल्या होत्या. एका वळणावरुन दुरुनच, जिच्या पायथ्याला स्फोट झाला ती इमारत दिसली. काळजात धस्स झालं. इमारतीच्या सगळ्या काचा छिन्नविछिन्न पडल्या होत्या.



क्षणभर थांबून माणसे ते दृश्य पहात होती. मीही थांबलो, पाहिले. न बोलताच घरी निघालो. दोन्ही बाजूचे फूटपाथ लोकांनी वाहात होते. मोठा आवाज करत पोलीस गाड्या, रुग्णवाहिका जात होत्या.

घरी पोचलो, इंटरेनेटवर बातम्या पाहू लागलो. भारतातल्या घरी आणि जवळच्यांना 'मी ठीक आहे', हे आधीच फोन करुन सांगितले होते. काही वेळाने 'उटाया'ची बातमी आली. बातम्या पाहात रात्री उशीरा झोपलो. एकूण घटनेत १०-१२ लोक दगावले असा अंदाज होता.

सकाळी उठल्या उठल्या nrk.no उघडले. ८६ ठार, माझे डोकेच चालेना, असे कसे झाले? बातमी वाचली हळूहळू समजले ऑस्लोतील बॉंम्बस्फोटापेक्षा 'उटाया' या ऑस्लोपासून ३०-४० किलोमीटर अंतरावरील बेटावर एका अज्ञात इसमाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात खूप जास्त माणसे मेली होती. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या होत्या, त्यातील काही जणांनी पोहून किनारा गाठला होता, तर अनेक बेपत्ता होते. काय करावे काहीच सुचेना. बातम्या पाहात शनिवारचा दिवस घरात बसून गेला.

रविवारी सकाळी बी. बी. सी वर पाहिले 'ऑस्लो कॅथेड्रल' मध्ये स्वतः नॉर्वेचे पंतप्रधान, राजा, राणी या घटनेतील मृतांसाठी प्रार्थना करत होते. त्यांना भावना एवढ्या अनावर होत होत्या की राजाराणीच काय पण पंतप्रधानांनाही त्यांचे अश्रू आवरले नाहीत. मग मात्र घरात बसवेना.



आम्ही बाहेर पडलो थेट 'कॅथेड्रल'मध्ये गेलो. अनेक लोक रांगेत उभे होते. थोड्या वेळात आत प्रवेश मिळाला. कॅथेड्रल मोठे सुरेख आहे. ३ बाजूनी दरवाजे आणि चौथ्या बाजूला क्रूस. दरवाजांच्यावर गॅलरी. तिथे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे लटकत होते. ऒळीने बेंचेस मांडलेले होते. कडेला बायबलच्या प्रती ठेवल्या होत्या. ऑस्लोच्या अगदी मध्यावर असूनही इथले वातावरण पवित्र आणि शांत होते.

पण दुर्दैव असे होते, की रविवारच्या प्रार्थनेला आलेल्या तिथल्या प्रत्येकाच्या चेह-यावर कसलासा करुण भाव होता. क्रूसाच्या समोर एक मोठी फॉइल पसरली होती. मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी लोक त्याच्यावर मेणबत्ती पेटवत होते. त्यात माणसे होती, बायका होत्या, चिमुरडी मुले होती, म्हातारी माणसे होती. अनेकांना अश्रू जड होत होते, काही धीर देत होते, सांत्वन करत होते.



मीही एक मेणबत्ती घेतली आणि घुढग्यावर खाली बसलो. आणि ती मेणबत्ती पेटवताना काय वाटले काय माहित. गळा दाटून आला. पहिल्यांदा मी नॉर्वेजिअन लोकांना रडताना पाहात होतो. कोण होती ही माणसे माझ्यासाठी? ना माझ्या मातीची, ना धर्माची, इतकंच काय पण कुणाशी साधी तोंडदेखली ओळखही नव्हती. पण गेल्या सहा-सात महिन्यांत नॉर्वेत राहताना, फिरताना, प्रवास करताना त्यांच्या चांगुलपणाची आणि निष्पाप मनाची ओळख फार जवळून झाली होती.

एरवी कधीही त्यांचे दर्शन हे हसतमुखच असायचे, सुखावणारे असायचे. वृत्ती ही नेहमीच दुस-याला मदत करणारी. आणि हा माझाच नाही तर माझ्या सा-या सहका-यांचा अनुभव होता. आणि आज एका घटनेत हा देश, ही माणसे दहशतवादाच्या क्रूर छायेखाली आली होती, सारा प्रकार दुःखी आणि अस्वस्थ करणारा होता.

कॅथेड्रलच्या बाहेर आलो, बाहेरच्या पटांगणात लोक फुलांचे गुच्छ ठेवत होते, फुलांचा मोठा गालिचा तयार होत होता. जणू काही या क्रूर घटनेत बळी गेलेल्यांना त्यांच्या देशबांधवांनी शेवटची निद्रा घेण्यासाठी केलेला तो सुंदर, कोमल बिछाना होता.




(छायाचित्रे nrk.no वरुन साभार.)

1 comment:

  1. touching.....छान लिहिले आहेस ...मन अस्वस्थ होते वाचून ...प्रत्यक्षात अनुभवून कसे वाटत असेल ह्याची कल्पना तुझ्या लेखावरून येते...

    ReplyDelete