Wednesday, June 8, 2011

ट्रॉमसो

सकाळी साडे नऊच्या सुमारास आमचे विमान विमानतळावर उतरत होते. उजव्या बाजूला सूर्य क्षितीजावर केशरी, गुलाबी रंग उधळत होता. इथे उत्तर ध्रुवावर त्या बिचार्‍याला बहुतेक वेळ क्षितीजावरच रहावे लागते. त्या रक्तवर्णी छटांसोबत आकाशाची निळाई अंग घासत होती. खाली दूर दूरवर पांढरेपणा विखुरला होता, मनुष्यवस्तीचा कुठे मागमूसही नव्हता. थिजलेल्या नद्यांच्या कडेने जाणारे रस्तेही गोठलेले भासत होते. कधीतरी मधूनच घरांवरचे, रस्त्यांवरचे इवले इवले लुकलुकते दिवे दिसायचे आणि आपण पृथ्वीवरच आहोत याची जाणीव व्हायची.

विमानाने हवेत एक गिरकी घेतली, आणि हळू हळू ते खाली उतरू लागले. पहिल्यांदाच न गोठलेली गोष्ट दिसली- 'समुद्र'. विमान आणि समुद्रातील अंतर कमी कमी होऊ लागले. ५०० मीटर, ३०० मीटर, १५० मीटर, उजव्या बाजूला दोन बेटांना जोडणार्‍या पूलाची कमान स्पष्ट दिसू लागली. १०० मीटर, ५० मीटर, "आता विमान समुद्रातच उतरते की काय?" वरचा श्वास वर, खालचा खाली. हात नकळत पुढच्या सीटवर आधार शोधू लागले, असेच दोन क्षण गेले. मनात "भीमरूपी महारुद्रा.." सुरु होणार एवढ्यात जमीन दिसू लागली आणि पुढच्याच क्षणाला धावपट्टीला विमानाच्या चाकांचा झालेला स्पर्श जाणवला. आम्ही सुखरुप खाली उतरलो. त्या लँडिगने सगळ्या विमान प्रवासाची, सकाळी केलेल्या धावपळीची आणि ’ट्रॉमसो’ ला येण्याची किंमत वसूल केली.

’ट्रॉमसो’. नॉर्वेच्या उत्तरेचे एक नितांत सुंदर, शांत बेट. आर्टिक प्रदेशात येणारे हे बेट प्रसिद्ध आहे ते इथून दिसणार्या ’पोलार लाईटस’साठी. सुर्यावर होणार्या वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात येणा-या लहरी पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या रेणूंना भिडल्या की आकाशात कधी लाल, कधी हिरव्या, तर कधी जांभळ्या रंगांची उधळण होते.

ध्रुव प्रदेशाजवळ हे दृश्य दिसण्याची शक्यता खूप जास्त असते. ’ट्रॉमसो’ यासाठी उत्तम ठिकाण आहे. पण निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी तुमचे नशीबही तितकेच जोरदार हवे. हे लाईट कधी दिसतील यावर फार आधी भाष्य करता येत नाही. आणि जेव्हा हे पहायचे तेव्हा हवामानही स्वच्छ असायला हवे. आकाश निरभ्र हवे.

आम्हाला हे लाईट दिसावेत ही प्रार्थना करत आम्ही ’ट्रॉमसो’च्या विमानतळावर ऊभे होतो. नॉर्वेतल्या इतर शहरांप्रमाणेच ट्रॉमसोच्या मध्यवर्ती भागाचे नाव 'सेंट्रम' आहे. तिथे बस पकडून पोचलो, तिथे थोडी चौकशी केल्यावर आम्हाला 'टूरिस्ट ऑफिस' मिळाले. तेथील कर्मचार्य़ांनी शहराची इस्तंभूत माहिती दिली. एक नकाशाही दिला. नकाशा पाहून हे लक्षात आले की शहर खूप लहान आहे. आणि पहायच्या गोष्टी जवळ जवळ आहेत.

आम्ही आधीच रहाण्याची सोय केली होती. नकाशा पाहात पाहात आम्ही रहायच्या ठिकाणी पोचलो. 'सिसिली' नावाच्या मुलीने आमचे तिथे स्वागत केले. आम्हाला जागा दाखवली. रहायची सोय उत्तम होती. सुसज्ज स्वयंपाकघर, आवश्यक ते सर्व फर्निचर, मोठा एल. सी. डी. टीव्ही, इंटरनेट. पहिल्या मजल्यावर झोपायची सोय होती. सिसिलीने सारे नीट समजावून सांगितले. अगदी टीव्ही कसा सुरु करायचा यापासून कचरा कुठे टाकायचा इथेपर्यंत. आमचा निरोप घेऊन आणि आमच्या ताब्यात घर देऊन ती गेली. डायनिंग टेबलवरून असे दृश्य दिसत होते.



जेवण करून आम्ही "पोलारिया" हे समुद्री जिवांचे संग्रहालय पहायला गेलो. इथे जिवंत आणि मेलेले (संग्रहित केलेले) दोन्ही प्रकारचे प्राणी आहेत. एक छोटे चित्रपट्गृहही आहे. इथे १५ मिनीटांचा पॅनोरॅमिक सिनेमा पाहिला. त्यात एका फ्रेंच माणसाची अंटार्टिका मधील हेलिकॉप्टरची सफर दाखवली होती. चित्रपटांमध्ये दाखवलेल्या काही काही जागा श्वास रोखून धरायला लावणार्‍या होत्या. सिनेमा संपल्यावर आम्ही संग्राहलयात गेलो. इथे ध्रुव प्रदेशात आढळणारे प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दाखवलेले होते. ध्वनी-प्रकाशाचा वापर करून तंतोतंत वातावरण निर्मिती केली होती.



नंतर एक मोठा कृत्रिम तलाव लागला. यामधे खूप विचित्र प्रकारचे मासे सोडलेले होते. काही कचकड्यासारखे कृत्रिम वाटत होते, पण थोडी हालचाल झाली की कळायचे हे खरे आहेत, जिवंत आहेत. मग लागला सील माश्यांचा तलाव, 'सील शो' हे इथले मुख्य आकर्षण. या तलावात सात वर्षाची एक प्रौढ सील माश्यांची मिशाळ जोडी आणि दीड महिन्याची दोन पिल्ले होती. भिंगरी लावल्या सारखे ते चार जीव एकसारखे इकडून तिकडे फिरत होते. मधूनच डोके पाण्यावर काढून मिश्या फेंदारत होते.



आम्ही तलावाजवळ पोचलो तेव्हा त्यांना खायला द्यायची वेळ झाली होती. जेव्हा या सील माश्यांना खायला देतात तेव्हा ते तरतरीत रहावे म्हणून त्यांना प्रशिक्षणही देतात. काही करामती शिकवतात. सूचना देताच पाण्याबाहेर येणे, पाण्यात गिरक्या घेणे, पाण्यात टाकलेली/बुडलेली वस्तू आणून देणे असे अनेक खेळांचे प्रकार पहायला मिळाले. पण बदली वाजवून जेव्हा ट्रेनरने आता अन्न संपले हे जेव्हा घोषित केले तेव्हा मात्र या करामती थांबल्या आणि सील पहिल्यासारखे आपल्या क्रीडेत गुंग झाले. मग परत ट्रेनरनी कितीही वेळा बोलावले तरीही ते आले नाहीत. माणसासाखेच ते फक्त मोबदल्यासाठी काम करतात.



मग मोठमोठे खेकडे, स्टार फिश, सन फिश, प्रवाळ पाहिले. इथे मुलांना खेळण्यासाठी बरीच खेळणी होती. ६-७ लहान मुलींचा घोळका पूर्ण अॅक्वेरिअमभर फिरत होता. त्या चित्र विचित्र प्राणी पाहून चकित होत होत्या, एका टाकीकडून दुसरीकडे धावत होत्या. पण त्यांच्या या खेळाला त्यांचे पालक किंवा संग्रहालयाचे अधिकारी कुणीही मज्जाव केला नाही. उलट त्यांच्या प्रश्नाची खूप संयमाने उत्तरे देण्याचा प्रयत्न दिसला. बोटीच्या डेकचा आभास दिलेले एक छोटे रेस्टॉरंट या संग्रहालयात होते.





इथून जवळच एक आर्ट गॅलरी होती. पण दुरुस्तीसाठी ती बंद ठेवण्यात आली होती. आम्ही चालत पुन्हा 'सेंट्रम'कडे आलो. इथून आम्ही पोलर लाईटस पाहण्यासाठी एका गाईड कंपनी सोबत शहराच्या बाहेर गेलो. ध्रुवीय प्रदेशात सामी नावाचे आदिवासी लोक राहतात. त्यांचे तंत्र वापरून केलेल्या सामी प्रकारच्या तंबूत आमची थांबायची सोय केली होती. आम्हाला तिथे गरम कपडे, बूट देण्यात आले. आमच्यासाठी चहा आणि थोडा हलका आहारही ठेवला होता.

सामी तंबूच्या मध्यभागी एका जाळीवर आग लावली होती. आगीची राख जाळीखाली पडत होती आणि धूर छताच्या मधल्या भागातून बाहेर पडत होता. आगीच्या भोवतीने आणि तंबूच्या आतील बाजूने सगळीकडे रेनडिअरची उबदार कातडी अंथरली होती. त्यामुळे बाहेरचे उणे तापमान तंबूमध्ये अजिबात जाणवत नव्हते.



आमच्या सोबतची बरीच माणसे डॉग स्लेजिंग करायला गेली. (कुत्र्यांच्या मदतीने बर्फावर गाडी ओढणे). तंबू बाहेर आमची आकाश बघत बसण्याची सोय केली होती. आमच्या सोबत एक ब्रिटिश व एक जपानी जोडपे होते, काका-काकू प्रकारातले. खास फिरायला आले होते. त्यांच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या.

चंद्राभोवती एक वलय पडले होते. अष्टमीच्या जवळची तिथी असावी. थोडेसे तारे लुकलुकत होते. बराच वेळ बसूनही लाईटस दिसायचे काही चिन्ह दिसेना. म्हणून आम्ही आमच्या नॉर्वेजिअन गाईडच्या आग्रहाखातर कुत्र्याची पिल्ले पहायला गेलो. तंबू जवळच एक छोटे घर बांधलेले होते. त्याच्या मागे १००-१५० कुत्र्यांची खुराडी होती. बरीच कुत्री आधीच गाडी ओढण्यासाठी बाहेर गेली होती. परिणमी, खुराड्यांमध्ये काही थोडी कुत्री उरली होती. घराच्या बाजूला एक मोठा पिंजरा उभारला होता. त्यात सगळी कुत्र्यांची पिल्ले ठेवली होती. इतक्या थंडीतही ती पिंजर्‍यात आनंदाने बागडत होती. त्यांच्याशी खेळण्याची इच्छा थंडीमुळे अवरती घेऊन आम्ही परत लाईट पाहण्यासाठी येऊन बसलो.



आमचे नशीब मात्र रुसलेले होते. गेला अठवडाभर निरभ्र राहिलेल्या आकाशात ढग वाढू लागले होते. पोलर लाईट दिसण्याची आशा अंधुक होऊ लागली. रात्री उशीरा चरफडत आम्ही घरी परतलो.

सकाळी उठलो तेव्हाही निराशा होतीच, ज्यासाठी आलो होतो ते काम काही झाले नव्हते. पण दिवाणखान्यातून दिसणारा बर्फाळ डोंगर पाहून निराशा कुठल्या कुठे पळून गेली. त्याचा रुपाने सगळा ध्रुवीय प्रदेशच साद घालत होता. आम्ही बाहेर पडलो.

ट्रॉमसो आर्टिक प्रदेशात येत असल्याने हिवाळ्यात इथे खूपच लौकर अंधार पडतो. आम्ही होतो त्या दोनही दिवशी सकाळी दहाला उजाडले आणि दुपारी दोन-अडीच वाजता मिट्ट काळोख पडला.

आम्ही 'माऊंट स्टॉर्स्टेविअन'कडे निघालो. ही ट्रॉमसोच्या जवळची एक टेकडी आहे. हीच्या डोक्यावर जायला छान केबलकार आहे. आम्ही केबलकारने जसे वर वर जाऊ लागलो, तसतसे ट्रॉमसो उलगडू लागले. हातातल्या नकाशासारखे भासू लागले.





इथे उंचावर खूप वारा होता. इतका की आपण उडून जाऊ असे वाटत होते. वा-यामुळे भयानक थंडी वाजत होती. पण समोरचे दृश्य ते सारे विसरायला लावत होते. आणि ते चित्र इवल्या कॅमे-यात बसत नव्हते.





खूप वेळ आम्ही टेकडीवरुन 'ट्रॉमसो' न्याहाळत होतो. आजूबाजूच्या उंच उंच डोंगरांमध्ये वसलेले टुमदार बेट. त्याच्यावर इमारतींची दाटी. त्या बेटाला दिसणा-या पुलांच्या कमानी. सारे चित्रासारखे. मधेच दर्यातून जाणारी एखादी नाव "अरे हे तर खरे आहे!" याची जाणीव करुन द्यायची.

इथे उंचावर थंडीत मस्त कॉफी प्यायला मिळाली तर किती मजा येईल. आम्ही असा विचार करत होतो तोच गॅलरीच्या पलिकडे एक सुसज्ज रेस्टॉरंट दिसले. ट्रॉमसो पहायच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेले नव्हते. मग खिडकीची जागा पकडून हॉट चॉकलेटचे घुटके घेऊ लागलो. आकाशाचा कॅन्व्हास नवी नवी रुपे दाखवत होता.





बराच वेळाने आम्ही टेकडी उतरलो. अंधार पडायला लागला होता. दिवेलागण सुरु झाली होती.



पण घड्याळात दुपारेचे दोनच वाजले होते. निसर्ग अंधारात बुडला असला तरी माणसे जागी होती. आम्ही 'पोलार म्युझियम' मध्ये शिरलो. हे संग्रहालय म्हणजे अनादि काळापासूनचा ध्रुवीय प्रदेशाचा इतिहास. इथली माणसे, त्यांचे राहणीमान, त्यांच्या क्रीडा सारे काही वेगवेगळ्या दालनांमधून मांडले होते. पुतळे तर अगदी खरे भासत होते. (नॉर्वेतील माणसेसुद्धा पुतळ्यासारखी भासतात, रेखीव, बांधेसूत)







ध्रुवीय प्रदेशातील प्राणी होते, त्यात सील,वॉलरस, ध्रुवीय अस्वल, कोल्हे, कुत्री असे नाना प्रकार होते. महत्वाचे म्हणजे सगळे प्राणी खरे होते.





त्यांची कातडी खरी होती. त्यावरुन हात फिरवता येत होता. त्यातली ध्रुवीय कोल्हयाची कातडी म्हणजे मी अत्तापर्यंत अनुभवलेला सगळ्यात माऊ स्पर्श होता. इतक्या सुंदर कातडीची कुणालाही भुरळ पडेल.





परिणामी इथे प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. आणि ती दाखवणारे देखावेही तिथे होते.





फक्त 'सील'चीच शंभराच्यावर सोलून ठेवलेली कातडी होती. कोल्हे, कुत्री, अस्वले वेगळेच. ते पाहून थोडे वाईट वाटले.



संग्रहालयाच्या बाहेर पडलो तेव्हा पूर्ण अंधार पडला होता. पोटात कावळे ओरडत होते. रहायच्या जागी परत जाता जाता एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो, सुदैवाने तिथे व्हेज पिझ्झा मिळाला. दुस-या दिवशी परताना राहून राहून वाटत होते, अजून रहावे इथे. विमानाच्या खिडकीतून खाली पाहताना ट्रॉमसो एखाद्या शांत, कोवळ्या, गाढ झोपलेल्या बाळासारखे दिसत होते.

2 comments:

  1. कधी बोलावतंय ट्रॉमसो कुणास ठाउक!

    ReplyDelete