ऑस्लोच्या उत्तरेला कोठलीशी एक टेकडी आहे असे माहीत होते. मागे अक्षय तिकडे जायचे म्हणून बसने आणि पायी बराच फिरला होता. पण खराब हवामानामुळे त्याला मधूनच मागे फिरायला लागले होते.
एकदा तिकडे जाऊनच येऊ या असे म्हणत आम्ही 'सोलेमस्कोगेन'ला जाणरी ५६ नंबरची बस पकडली. या मार्गावरचा सोलेमस्कोगेन हा सगळ्यात शेवटचा थांबा आहे. इथून बस मागे वळते आणि परत ऑस्लोला जाते. जाताना तुरळक घरे दिसतात. रस्ताही थोडा वळणावळणाचा.
सोलेमस्कोगेनला आम्ही बसमधून उतरलो आणि सगळीकडे पसरलेले, कापसासारखे पिंजून ठेवलेले हिम दिसू लागले.
खूप थंडीही वाजू लागली. तसे आम्ही बर्याच तयारीने गेलो होतो. जॅकेट, स्वेटर, मोजे, बूट. पण ती तयारीसुद्धा पुरेशी वाटत नव्हती.
आम्हाला सोडून आमची बस तर निघून गेली. पुढची बस बरोबर एका तासाने होती. म्हणजे एकंदरीत बराच वेळ होता. समोर वाट खुणावत होती. आम्ही चालायला सुरूवात केली.
इथून पुढे अर्धा तास आम्ही स्वर्गात होतो. दोन्ही बाजूला उंच सुरूची झाडे, त्यांच्या पानात अडकून राहिलेले मऊसूत हिम, वार्याच्या एखाद्या लहरी बरोबर ते खाली यायचे आणि वाटायचे हिमवर्षाव सुरु झाला की काय?
मग एखाद्या चित्रपटाला शोभावे असे 'लोकेशन' सापडले. इथे बसून फोटो काढण्याचा मोह अक्षयला आवरला नाही,
(अक्षय)
इथे 'स्किंग' करायला बरेच लोक येतात. मधूनच एखादा माणूस सूं सूं करत जायचा.
थोडे पुढे चालत गेल्यावर गोठलेला तलाव दिसला.
याच्यावर चालत जायची खूप इच्छा होती. पण आम्ही दोघेही इतके गारठलो होतो की जीभ जड झाल्याने नीट बोलताही येत नव्हते.
अप्रतिम निसर्गसौंदय आणि भयानक गारठा दोन्हीमुळे पाय हालत नव्हता. पण अंधार पडू लागला होता. मागे फिरलो, सुरुची झाडे हात हलवून निरोप देत होती.
बसस्टोपवर पोचलो तेव्हा दिवेलागण सुरू झाली होती. बस ठरल्यावेळी आली आणि आम्ही ऑस्लोला परत येऊ लागलो. आज आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षाही बरेच काही मिळाले होते. :)